डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल:जर बिल अदा करण्यात आलेले नसेल, तर सभापतींचा राजीनामा घेण्याची वेळ का आली..? नगराध्यक्षांना सवाल..

⚡सावंतवाडी, ता. ९-: महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील साहित्य खरेदीवरून राजकीय वातावरण तापले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनाचे जिल्हा प्रवक्ता डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. या प्रकरणात सभापतींचा राजीनामा घेण्यात आला असताना तो ‘तात्पुरता’ असल्याचे सांगून सारवासारव केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाणीपुरवठा विभागामार्फत सुमारे साडेसतरा लाख रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली असून संबंधित बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही, असा दावा केला जात आहे. जर बिल अदा करण्यात आलेले नसेल, तर सभापतींचा राजीनामा घेण्याची वेळ का आली, असा सवाल डॉ. परुळेकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींवर राजीनामा देण्याची वेळ आली असल्याचा दावाही त्यांनी केला. सभापतींचा तात्पुरता राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची आहे, याचे स्पष्टीकरण नगरपरिषद प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याची चर्चा जनतेत असल्याचा आरोप डॉ. परुळेकर यांनी केला. त्या पैशांची वसुली करण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा सावंतवाडीतील नागरिकांमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत पुरावे अथवा स्वतंत्र पुष्टी समोर आलेली नाही.
‘खरा राजीनामा कोणी द्यायला हवा—सभापतींनी की नगराध्यक्षा महोदया यांनी?’ असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी डॉ. परुळेकर यांनी केली.
