निलेश राणे यांनी कुडाळ नगरोत्थानचे श्रेय घेऊ नये…!

मविआ नगरसेवकांची टिका: भाजपाने आतापर्यंत विकासकामांना खो घालण्याचे आणि शासनाकडून आलेल्या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचेच काम केले..

⚡कुडाळ ता.१६-: नगरोत्थान योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीला 4 कोटींचा निधी मंजूर झाला असून हा निधी शासनाच्या माध्यमातून आलेला आहे. त्यामुळे भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. आमदार वैभव नाईक यांच्या मेहनतीने हा निधी मंजूर झाला असून याचे श्रेय आ.वैभव नाईक यांचेच आहे. भाजपाने आतापर्यंत विकासकामांना खो घालण्याचे आणि शासनाकडून आलेल्या निधीचे फुकटचे श्रेय घेण्याचेच काम केले आहे, अशी टीका कुडाळ न.पं.च्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली.

येथील ठाकरे शिवसेना शाखेत गुरूवारी न.पं.तील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा सौ.अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, नगरसेविका सौ.श्रेया गवंडे, सौ.सई काळप, सौ.श्रुती वर्दम, सौ.ज्योती जळवी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा अक्षता खटावकर म्हणाल्या, कुडाळ न.पं.ला शहर विकासासाठी दरवर्षी शासनाच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत निधी येतो. त्यामुळे याचे फुकटचे श्रेय भाजपाने घेऊ नये. उपनगराध्यक्ष किरण शिंदे म्हणाले, नगरोत्थान मधून मंजूर झालेल्या निधीचे फुकटचे श्रेय निलेश राणे घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर ते आपण निधी आणला म्हणत असतील तर शहरातील मुख्य कचरा प्रश्नी ते गप्प का?. शहरातील जटील बनलेला कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एमआयडीसीतील जागेची मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांचीही भेट घेऊन लक्ष वेधले आहे. मात्र अद्याप याबाबत शासनाकडून कार्यवाही झालेली नाही. सुसज्ज मच्छीमार्केट इमारतीसाठी निधी उपलब्ध आहे, परंतू अद्याप शासनाने न.पं.कडे जागा हस्तांतरित केलेली नाही. कुडाळ शहराचा विकास हा भाजप सरकार अडवून ठेवण्याचे काम होत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष शिंदे यांनी यावेळी केला.
मंदार शिरसाट म्हणाले, न.पं.त महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात शहर विकासासाठी भरघोस विकास निधी आला. परंतू शिंदे-फडणवीस सरकार येताच शहरातील 3 कोटींच्या विकासकामांना ब्रेक देण्यात आला. न.पं.तील सत्ताधारी महाविकास आघाडीने केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासासाठी निधी आला. या कामांनाही शिंदे-फडणवीस सरकारने ब्रेक दिला. आता शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात निलेश राणे यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये. या निधीचे सर्व श्रेय आ.वैभव नाईक यांच्या मेहनतीचे आहे. निलेश राणे यांना निधी द्यायचा होता तर विविध हेड मधून ते निधी आणू शकले असते. कचरा प्रकल्पासाठी एमआयडीसी येथील जागा मिळण्यासाठी न.पं.ने पैसे भरूनही शासनाकडून जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे राणेंनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून मिळालेल्या अग्निशमन बंब गाडीला कोणी विरोध केला होता हे जनतेला माहीत आहे. माजी खासदार राऊत व आमदार नाईक यांच्या माध्यमातून शहरात गार्डन झाले. सतराही प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे जनतेचा कौल महाविकास आघाडी व आमदार नाईक यांच्याच बाजूने आहे. दोन महिन्यांत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. त्यानंतर शहरातील नाना नानी पार्क, मच्छीमार्केट इमारत, कचरा प्रकल्प, न.पं.ची सुसज्ज इमारत तसेच सतराही प्रभागातील विकासकामे मार्गी लावली जातील. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार नाईक यांना मोठ्या मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे मंदार शिरसाट यांनी सांगितले. संतोष शिरसाट म्हणाले, शासनाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गत चार कोटींचा निधी न.पं.ला मंजूर झाला आहे. मात्र निलेश राणे फुकटचे श्रेय घेऊन कुडाळवासियांची दिशाभूल करीत आहे.

You cannot copy content of this page