जयेंद्र परूळेकर:नौटंकीबाज पध्दतीने गोड गोड बोलून मतं लाटण्याचा धंदा आता चालणार नाही..
⚡सावंतवाडी,ता.१४-: सत्तेच्या लालसेपोटी येणाऱ्या निवडणुकीत मतावर डोळा ठेवून सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विद्यमान मंत्री दिपक केसरकर आणि त्यांचे महायुती सरकार मधील संकटमोचक सहकारी मंत्री हे सामाजिक भान पूर्ण पणे विसरलेले असून उदघाट्नाची घाई वेळागर येथे करून विकासकामे केल्याचा देखावा करत असल्याची टीका जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की भारताचे खरे रत्न असलेले स्वर्गीय रतन टाटा यांचे दुःखद निधन होऊन चार दिवसही झालेले नसताना त्यांच्या “सुतक” काळात येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आचारसंहिता लागण्या अगोदर वेळागर येथील ताज प्रकल्पाचे भूमिपूजन घाईघाईत करण्याचा डाव त्यांनी रचला.सुजाण आणि सतर्क असलेल्या वेळागर येथील जनसामान्यांनी तो कुटील डाव अक्षरशः उधळून लावला. वेळागर येथील सामान्य जनतेचं विशेषतः लढाऊ रणरागिणींचे खरोखरच हार्दिक अभिनंदन.
गेल्या पंधरा वर्षांत एकही प्रकल्प आणू न शकलेल्या,एकही रोजगार निर्माण करू न शकलेल्या निष्क्रिय आणि नाटकी आमदाराला निवडणूका जवळ आल्या की भूमीपूजने करण्याचा ऊत येतो हे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील जनतेला आता पाठ झालेले आहे.केसरकर यांच्या निष्क्रिय कारभाराची जंत्री तर फार मोठी आहे. नौटंकीबाज पध्दतीने गोड गोड बोलून मतं लाटण्याचा धंदा आता चालणार नाही हेच संतापलेल्या वेळागर वासियांनी काल दाखवून दिले.अशी टीका श्री परुळेकर यांनी केली आहे.
