बाबा सावंत:ते स्मारक मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणावह ठरेल,..
⚡मालवण ता.२४-:
ज्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे महाराजांचा अपमान झाला असून त्या जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू नये. जर हा पुतळा उभारला गेल्यास राजकोट येथील त्या कटू आठवणींना कायम उजाळा मिळेल तसे होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या मालवणच्या सागरातील अजरामर व भव्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचे स्मारक उभारून किल्ल्याची शोभा वाढवावी, असे स्पष्ट मत मराठा महासंघ सिंधुदुर्गचे मालवण तालुका समन्वयक बाबा सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
राजकोटच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुनर्स्मारक म्हणून शासन स्तरावरून पुतळा उभारण्यासाठी वीस कोटींची तरतूद केली आहे . तरी ते स्मारक राजकोट येथे उभे न करता छत्रपतींनी मालवणच्या सागरात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये त्याची उभारणी व्हावी. सिंधुदुर्ग किल्ल्याची ३५० वर्षपूर्ती आणि नौदल दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजकोट येथे नौदलाने पुतळ्याची निर्मिती केली होती. परंतु त्यानंतर शासनाच्या निष्काळजीपणामुळे महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना व त्यानंतर राजकीय नेत्यांनी महाराजांच्या पुतळ्याचे केलेले राजकारण हे जगजाहीर आहे. परंतु यामुळे समस्त मालवणवासीय तसेच शिवप्रेमी, शिवभक्त यांना झालेले दुःख हे शब्दात मांडणे कठीण आहे. त्यामुळे महाराजांचे स्मारक राजकोट ऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारावे, जेणेकरून झालेल्या घटनेचा विसर पडून नवीन स्मारक मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणावह ठरेल, असेही बाबा सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
