…तर जमिनीत घुसून ताबा मिळवू …!

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा ; महसूल विरोधातील आंदोलन यशस्वी

⚡दोडामार्ग ता.२४-: सासोलीतील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करत बेकायदेशीररित्या अकृषक सनद देऊन प्रशासनाला काळिमा फासणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी उध्दवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सासोलिवासीयांना घेऊन मंगळवारी दोडामार्ग तहसिल कार्यालयावर मोर्चा नेला.पोलिसांनी हा मोर्चा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अडविला.त्यामुळे पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.अखेर तहसिलदार अमोल पवार यांनी पारकर व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला आत घेत चर्चा केली.यावेळी पारकरांनि उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अधिकारी अनुत्तर झाले.अखेर अकृषिक सनदा रद्द कराव्यात त्या देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृत बांधकाम तोडावे अन्यथा आम्ही त्या जमिनीत घुसून आमच्या जमिनीचा ताबा मिळवू असा निर्वाणीचा इशारा देत आंदोलन मागे घेतले.

सासोली मधील शेतकऱ्यांवर अन्याय करून धनदांडग्या बिल्डर लॉबीला पाठीशी घालणाऱ्या महसुलविरोधात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी ठरल्याप्रमाणे मंगळवारी आंदोलन केले.या आंदोलनाची सुरुवात दोडामार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली.त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली.जमीन आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची , अकृषक सनदा रद्द झाल्याचं पाहिजेत या आणि अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.त्यानंतर हा मोर्चा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडविला.त्यामुळे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि पारकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

अखेर तहसीलदार अमोल पोवार वन , भूमिअभिलेख आणि गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन बाहेर आले.व शिष्टमंडळ घेऊन आत बोलावीत चर्चा केली यावेळी पारकर यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली .मात्र अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत.वनविभागाने सुरुवातीला केवळ ९७ झाडांची तोड झाल्याचा अहवाल दिला होता तो आता ६००० पेक्षा अधिक झाडे तोडली असा दिला .याचाच अर्थ यात गौडबंगाल आहे .ही झाडे आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वाढली कशी ? आणि मुद्देमाल गायब झाला कुठे याचे उत्तर द्या असे वनाधिकाऱ्यांना सुनावले.तर सामायिक जमिनीत कोणाचाही पोटहिस्सा झालेला नाही मग असे असताना भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी मोजणी केलीच कशी ? त्यांना हा अधिकार दिलाच कोणी असाही प्रश्न उपस्थित करत समबंधितांना धारेवर धरले.तर अकृषक सनदाही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यासाठी खोटे अहवाल देणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का केली नाही ? असा सवाल तहसीलदार अमोल पोवार याना विचारला त्यावर हे अधिकार मला नाहीत ते जिल्हाधिकारीच करू शकतात असे सांगितले.
चौकट –
उध्दवसेनेचे तालुकाप्रमुख आंदोलनात सहभागी –
संदेश पारकर यांच्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही असे दुसरे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जाहीर केले होते.मात्र उध्दवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस या आंदोलनात सहभागी झाले.शिवाय काँग्रेसचे सुभाष दळवी , संजय नाईक हेही या आंदोलनात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.यावर बोलताना गवस यांनी शिवसेना नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत आली असून ही लढाई न्यायाची आहे त्यामुळे आपण सहभागी झाल्याचे सांगितले.
फोटो – दोडामार्ग शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा नेत आंदोलन केले व त्यानंतर तहसीलदार अमोल पोवार यांच्याशी चर्चा केली

You cannot copy content of this page