वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवडा अंतर्गत यावर्षी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छता रॅलीसह महास्वच्छता अभियान व अन्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. तरी या विविध कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.
गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामुहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून दरवर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. स्वच्छतेबाबत जनजागृतीपर १४ सप्टेंबर २०२४ ते ०२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. २२ सप्टेंबर रोजी मांडवी खाडी येथे कांदवळन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृहात पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी गटात ‘‘स्वच्छता विषयी प्रश्नमंजूषा‘‘, दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद सभागृहात पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी गटात ‘‘कच-यातून कल्पकता स्पर्धा‘‘, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी गटात शहरातील सर्व शाळानिहाय ‘‘चित्रकला स्पर्धा‘‘, दि.२८ रोजी सकाळी ७ वाजता झुलता पुल वेंगुर्ला ते नवाबाग किना-यापर्यंत ‘‘महास्वच्छता मोहीम‘‘, दि.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला हायस्कूल, दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या मार्गे ‘‘स्वच्छता रॅली‘‘ आयोजित करण्यात आलेली आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेकरीता स्वच्छता विषयक सर्व प्रकारची कामे करणा-या तसेच नगरपरिषदेस प्राप्त होणा-या विविध पुरस्कारांमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या सर्व सफाई कर्मचा-यांचा फिटनेस सुधारण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम कॅम्प येथे ‘‘विविध मैदानी खेळांचे‘‘ आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे ‘‘भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देईन व इतरांना देखील स्वच्छतेस प्रेरीत करीन‘‘ ही शपथ वेंगुर्ला शहरातील सर्व महीला बचत गट, सर्व शासकीय कार्यालये, सर्व शाळा व महाविद्यालये याठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिली.
‘‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत विविध कार्यक्रम…!
