श्रीपाद नाईक:माड्याच्यावाडीत योगशिक्षणाचा नवा अध्याय,सद्गुरू गावडे काका महाराजांच्या कार्याचे श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक

⚡कुडाळ ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात योग चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी सद्गुरू गावडे काका महाराज यांचे योगदान मोलाचे आहे. योग ही परमेश्वररूपी सेवा असून, या सेवेतून समाजाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ करण्याबरोबरच सर्वांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करा. आयुर्वेदात योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून, योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डिप्लोमा इन योगशिक्षक आणि एम.ए. इन योगा या अभ्यासक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रविवारी, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला.
आध्यात्मिक सद्गुरू श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू गावडे काका महाराज यांनी संस्थापित केलेला श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. समाजाच्या तळागाळापर्यंत योगशास्त्राचे शुद्ध व शास्त्रशुद्ध शिक्षण पोहोचविणे, प्रत्येक गावात प्रशिक्षित योगशिक्षक उपलब्ध करून देणे आणि योगाच्या माध्यमातून समाजाचे आरोग्य अधिक सक्षम करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यावेळी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, माड्याचीवाडीसारख्या ग्रामीण भागात धार्मिक कार्यासोबतच सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून योग चळवळ सुरू आहे. या कार्यासाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. योगाची महती देशभरात वाढत असून, सुदृढ पिढी घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून योगाकडे पाहिले पाहिजे. माणसाला निरोगी ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य योगाच्या माध्यमातून होते. त्यामुळे प्रत्येकाने समाजसेवेच्या भावनेतून या चळवळीच्या विस्तारासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सद्गुरू गावडे काका महाराज यांनी भविष्यातील उपक्रमांची माहिती देताना, येत्या काही महिन्यांत माड्याचीवाडी येथे भव्य योग भवन साकारण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. योगशिक्षणाच्या माध्यमातून समाजात आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षांत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन योगशिक्षक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण केले आहे. चालू शैक्षणिक वर्षात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून एम.ए. इन योगा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला परवानगी मिळाली असून, या अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘एक गाव, किमान दोन योगशिक्षक’ हा संकल्प
प्रत्येक गावात किमान दोन प्रशिक्षित योगशिक्षक उपलब्ध व्हावेत, हा न्यासाचा संकल्प आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत योगशिक्षण पोहोचविण्याचे ध्येय संस्थेने ठेवले आहे. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीतील या परंपरेचा उपयोग समाजसेवेसाठी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
योगशिक्षक आनंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर आणि माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनीही योगाचे महत्त्व विशद केले. सद्गुरू गावडे काका महाराज यांनी माड्याचीवाडी पंचक्रोशीत विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविताना योगासारखी महत्त्वपूर्ण चळवळ उभी केली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, राकेश केसरकर, एकनाथ गावडे, सुजय गावडे, दाजी गोलम, पंकज कामत, प्रीती कुशे, विघ्नेश गावडे, केसर वानवडेकर, दत्तात्रय किनळेकर, गौरव मुंज, तनया सुद्रीक, प्राजक्ता साळगावकर, न्यासाचे पदाधिकारी, योगशिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राकेश केसरकर यांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते योगशिक्षक तसेच योगप्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
