रिक्षेतील प्रवासी महिलेसह दोघे गंभीर जखमी..
मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील सागरी महामार्गावर आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारच्या धडकेने रिक्षा थेट रस्त्यालगतच्या मळ्यात कलंडल्याने रिक्षेतील प्रवासी महिला वर्षा भालचंद्र नागवेकर (वय ५१) (रा कुडाळ बिबवणे) या महिलेच्या डोक्यास तर भालचंद्र नारायण नागवेकर हे गंभीर दुखापत झाली. तर रिक्षातील इतरांना किरकोळ दुखापत झाली. जखमीना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताबाबत सायंकाळी उशिरापर्यंत मालवण पोलीस स्थानकात कोणतीही नोंद नव्हती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ वेतोरा येथील रिक्षा चालक अशोक अर्जुन लटम हे आपल्या रिक्षा मधून इशांत भालचंद्र नागवेकर, वर्षा भालचंद्र नागवेकर व भालचंद्र नारायण नागवेकर या तीन प्रवाशांना घेऊन कुडाळ बिबवणे येथून मालवण कांदळगाव येथे जात होते. मालवण मधील सागरी मार्गांवरून ही रिक्षा जात असताना देवगडवरून कुंभारमाठच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारने रिक्षाच्या धडक दिली. या धडकेने अपघातात रिक्षा रस्त्या नजीकच्या मळ्यात कोसळली. या धडकेत स्विफ्टकारच्या दर्शनी भागाचेही नुकसान झाले. रिक्षा चालक व प्रवासी मळ्यात कोसळल्याने यातील वर्षा नागवेकर या महिलेला गंभीर दुखापत झाली. तर इतरांना किरकोळ दुखापत झाली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी रिक्षामधील प्रवाश्यांना बाहेर काढले व मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर डॉ. अतुल महादळे डॉ. अहमद यांनी उपचार केले. जखमीना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल सुशांत पवार महादेव घागरे, शरद गुहाटे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात नव्हती.
