नाडन येथील २२ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या…

⚡देवगड ता.०४-: देवगड तालुक्यातील नाडण पुजारे वाडी येथील पराग गणेश पुजारे या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी स्वयंपाक घरावरील माळ्यावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडन पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (22) याची आई आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन मुंबईला गेली होती. त्यामुळे रात्री घरी वडील व मुलगा असे दोघेजण होते. रात्री ८ च्या सुमारास काकाच्या घरी जेवण करून झालेनंतर रात्री १० वाजता पराग झोपण्यासाठी गेला.त्यावेळी
त्याने आईशी फोनवरून संवादही साधला होता. बुधवारी सकाळी तो उठला नाही म्हणून वडील गणेश पुजारे हे त्याला पाहण्यासाठी स्वयंपाक घराच्या माळ्यावरती गेले असता त्यावेळी त्यांना नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत तो दिसून आला.
या घटनेची माहिती देवगड पोलिसांना मिळतात देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेंद्र महाडीक व आशिष कदम यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.
पराग याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.मयत पराग हा वेल्डिंग व्यवसायाचे काम करत होता.
त्याच्या पश्चात आई वडील व बहीण असा परिवार आहे. या घटनेची देवगड पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम करत आहेत.

You cannot copy content of this page