⚡देवगड ता.०४-: महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते.मात्र या संपामध्ये देवगड आगारातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून ७० टक्के सर्वसेवा सुरळीत सुरू असल्याचे एसटी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांनी सांगितले.
देवगड आगारातून बुधवारी मध्यरात्री पासून देवगड आगारातील ३० टक्के कर्मचारी संप सामील झाले तर ७० टक्के वाहतूक सुरूचं होती. या आगारातील १७ गाड्या गणेशोत्सवानिमित्त जादा वाहतुकीसाठी मुंबई येथे गेल्या आहेत.तरीही देवगड एसटी प्रशासनाने लांब पल्ल्याच्या ५:३० पुणे, ८:१० पुणे, बोरवली, सकाळी ६ पणजी, ६:४५ अक्कलकोट या लांब पल्ल्याच्या गाड्या नियमित वेळेत सोडल्या आहेत. तर ग्रामीण भागातील वस्तीच्या गाड्याही चाफेड,रेबंवली,कातवण,पोयरे,
निरोम,तळेबाजार,कुणकवण,
गोवळ, मुणगे,कोर्ले,वानिवडे या गाड्यादेखील वेळेत सोडल्या आहेत. याव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व शालेय फेऱ्यादेखील सुरू ठेवल्या होत्या. या संपामध्ये ३० टक्के कर्मचारी वर्ग सहभागी झाला असून संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी एसटी आगारासमोर घोषणाबाजी करत संपाला पाठिंबा दर्शविला.
ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्याने पुकारलेल्या या संपामुळे प्रवासी वर्गाततून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
