⚡देवगड ता.०४-: मोंडतर वरची वाडी येथील रहिवाशी सुभाष गोपाळ चौघुले (६९ वर्षे) यांचे दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दिवा येथे वाहनाची धडक बसून जागीच निधन झाले. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी त्यांना ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले.
शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर कल्याण येथील त्यांच्या निवासस्थाना जवळील (बैलबाजार) स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१५ मध्ये पोर्ट ट्रस्टच्या मरीन विभागातून ‘शोअर तांडेल’ या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. बीपीटी एम्प्लॉईज युनियनचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच मांड करी बालसंगीत मेळा या मंडळाचे सरचिटणीस पद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, दोन जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणारा हरहुन्नरी समाज कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती. सेवानिवृत्ती पश्चात त्यांचे नियमित गावी येणे जाणे होत असे. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
