⚡मालवण ता.०३-: मालवण शहरातील पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर काल सायंकाळी एका वाहनाच्या चाकाखाली चिरडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मालवण पोलिसांनी केलेल्या तपासात हा अपघात पुणे – मालवण एसटी बस (एमएच १३ सीयु ७९१९) मुळे झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी एसटी बस चालक रामदास मारुती पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या अपघातातील मृत व्यक्तीची देखील ओळख पटली असून सुभाष गुणाजी मांजरेकर (वय ६९, रा. गवंडीवाडा मालवण) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मालवण पोलीसांनी दिली आहे.
काल सोमवारी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मालवण पेट्रोल पंप समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी एक पुरुष मृतदेह पावणे आठ वाजण्याच्या सुमारास नागरिकांना दिसून आला. या मृतदेहाच्या डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झालेला असल्याने त्याची ओळख पटविणे मुश्किल झाले. याबाबत माहिती मिळताच मालवण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मोठ्या गाडीच्या चाकाखाली सदर व्यक्ती सापडून मृत्यू झाला असावा असं अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला. याबाबत मालवण पोलिसांनी केलेल्या तपासात मृत व्यक्तीची ओळख पटली असून सुभाष गुणाजी मांजरेकर असे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पुणे – मालवण या एसटी बसच्या चाकाखाली सुभाष मांजरेकर हे सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक रामदास मारुती पाटील याच्यावर भरधाव आणि हयगयीने वाहन चालवून दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच अपघाताची माहिती न दिल्याबाबत गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस श्री. टेंबूलकर हे करत आहेत.
