मालवणात भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन…

⚡मालवण ता.०१-: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत या विरोधात आज मालवणात भाजपा पदाधिकारी यांनी निषेध आंदोलन छेडले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मालवण भाजपा कार्यालय परिसरात भाजपा पदाधिकारी यांनी एकवटत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, पूजा वेरलकर, आपा लुडबे राजन गावकर, भालचंद्र राऊत यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यांच्या नावाने राजकारण होता नये. महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल दाखवत असलेले प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. पुतळा कोसळल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही माफी मागितली, असे असताना महाविकास आघाडीकडून सोयीचे राजकारण सुरु आहे, अशी टीका धोंडी चिंदरकर यांनी करत जेव्हा विशाळगडावर अतिक्रमण झाले होते तेव्हा महाविकास आघाडीची ही मंडळी कुठे होती ? असा सवाल केला.

राजकोट किल्ला येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धुडघूस घालत तटबंदीचे दगड कोसळवले. याचे फोटो, व्हिडिओ आहेत. तरी पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी. अशीही मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यावेळी तेथे १५ मिनिटात पोहचणाऱ्या आम. वैभव नाईक यांची चौकशी व्हावी, अशी मागणी धोंडी चिंदरकर यांनी केली.

You cannot copy content of this page