शिवपुतळ्यावरून राजकारण करणाऱ्यांचा हिशोब जनताच करणार…

जरांगे पाटील:शिवपुतळा दुर्घटनेतील जे दोषी आहे ते सुटले नाही पाहिजेत..

⚡मालवण ता.०१-:
शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे, आमच्या भावना दुखावल्या आहेत. या विषयावरून सत्तधारी व विरोधक राजकारण करत आहेत. छत्रपतींच्या नावे राजकारण करू नका. सत्ताधारी व विरोधक यांनी राजकारण खालावले असून जनता या दोघांनाही सुट्टी देणार नाही, जनताच यांचा हिशोब करणार, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील यांनी मालवण कुंभारमाठ येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. तसेच शिवपुतळा दुर्घटनेतील जे दोषी आहे ते सुटले नाही पाहिजेत, असेही जरांगे म्हणाले.

मालवण मधील राजकोट किल्ल्यातील शिवपुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर राजकोट येथे पाहणी साठी आलेल्या मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, शिवपुतळा कोसळण्यावरून सत्तधारी व विरोधक राजकारण करत आहेत. राजकारण करण्यास दुसरे विषय आहेत. थोडे दिवस बघा, या दोघांनी अशीच नाटके केली तर पूर्ण जनता यांच्या विरोधात जाणार. राजकारण करण्यापेक्षा दोषीला शोधून आणा, तातडीने काम करण्यासाठी कोणी सांगितले ते शोधा, त्यात कोणाकोणाचा हात आहे ते शोधा, तीन तीन वर्षात जे काम होत नाही, ते सहा सात महिन्यात कसे उभे राहते, ते करून घेणारा कोण आहे कि काम करणाऱ्या ठेकेदाराला घाई होती ते शोधा. थोड्याच दिवसात दूध का दूध, पानी का पानी होणार आहे, काय घडल व कोण दोषी आहे, हे जनतेसमोर येणार आहे, जनता सगळ्यांचा हिशोब करणार आहे, असेही जरांगे म्हणाले.

शिवपुतळा दुर्घटनेतील दोषी सुटता कामा नये. कायद्यात दुरुस्ती होऊन कोणत्याही महापुरुषांच्या स्मारकाचे बांधकामाच्या बाबतीत अशा घटना घडल्यास त्यातील दोषी सुटले नाही पाहिजे. दर्जाहीन बांधकाम करणारे लोक रस्त्यावर फिरायला ठेवलेच नाही पाहिजे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

पोलीसांनी मालवण मध्ये बंदोबस्त ठेवला असल्याबाबत जारांगे यांना विचारले असता जरांगे म्हणाले, मी इथे काही करायला आलेलो नाही, करायचे असते तर सांगून आलो असतो. मी अशी गद्दारी कधीच करत नाही. मी एक मावळा आहे. शिवपुतळा कोसळल्याने मी आणि माझा समाज, जनता दुखावली आहे, त्यामुळे पाहणी करणे, दर्शन घेणे हे माझ काम आहे, मला राजकारण करायचे नाही, असेही जरांगे म्हणाले.

यावेळी वाढवण बंदराच्या विषयाबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, बंदरामुळे तेथील स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होणार असेल, बंदरामुळे हजारो मच्छिमारांचे जीवन उध्वस्त होणार असेल तर महाराष्ट्रातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page