आदित्य ठाकरे:आम्ही दिल्ली समोर झुकणार नाहीतर दिल्लीला महाराष्ट्र समोर झुकवू..
मालवण (प्रतिनिधी)
शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना असून शिवपुतळा उभारणीत झालेला भष्ट्राचार लपविण्यासाठी भाजपाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्यासमोरच करण्यात आलेला बालिशपणा अख्या जगाने पाहिला आहे. आम्ही संघर्ष करायला आलेलो नव्हतो, असे असतानाही भाजपच्या चिंधीचोरांनी गोंधळ घातलाच असे सांगत ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुतळा कोसळणे ही घटना आमच्या अस्मितेशी संबंधित असल्याने आम्ही यासाठी सदैव लढण्यासाठी तयार आहोत, दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही, तुम्हालाच झुकवू, महाराष्ट्र कधी झुकणार नाही, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला
मालवण मधील राजकोट किल्ल्यातील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी आज मालवणात महाविकास आघाडीतर्फे आयोजित निषेध मोर्चा काढण्यात आला. मालवण भरड येथून सुरु झाल्यावर बाजारपेठ येथून मोर्चा फोवकांडा पिंपळपार नजीक आला असताना राजकोट किल्ल्यावर घडलेल्या राड्यामुळे हा मोर्चा थेट राजकोट किल्ल्यावर नेण्यात आला. राजकोट येथील राड्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फोवकांडा पिंपळपार येथील नियोजित सभास्थळी येऊन मोर्चाला संबोधित केले. जोरदार कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आम. जयंत पाटील, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, आम. वैभव नाईक, आम. सुनील शिंदे यांनी पावसात भिजतच भाषणे करत जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आम. राजन साळवी, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, अर्चना घारे, जान्हवी सावंत, सुशांत नाईक आदी व इतर उपस्थित होते.
भर पावसात उपस्थिताना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दहा वर्षाच्या सत्तेत भाजपाने जे जे उभे केले आहे, त्याला गळती लागलेली आहे. राम मंदिर, नवी संसद यांना गळती लागली. मुंबई मेट्रो, मुंबई गोवा महामार्ग अशा अनेक कामात भ्रष्टाचार झाला. राजकोट येथील महाराजांच्या पुतळ्यातही भष्ट्राचार झालेला असून त्यातील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारण्याची परवानगी कशी देण्यात आली? कोण आहे हा आपटे? त्याला पसार होण्यासाठी शासनाने मदत केली आहे काय? टेंडरसाठीच पुतळा उभारण्यात आला होता काय? आता या सरकारला याच मातीत गाठण्याची वेळ आलेली आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पुतळा कोसळणे प्रकरण भाजप सरकारच्या अंगाशी आल्याने आता ईडी, सीबीआयची भिती घालून विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाईल, पण आता आम्ही गप्प बसणार नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही. दिल्लीत जावून फक्त राजकारण करण्यात त्यांना रस आहे. आमचा जन्म झुकण्यासाठी झालेला नाही, आम्ही लढत राहणार आहोत. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेने आम्हाला चिड आलेली आहे, आमच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. याला स्वाभिमानानेच उत्तर दिले पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यात भ्रष्ट्राचाराचा कळस …जयंत पाटील
यावेळी जयंत पाटील म्हणाले, शिवपुतळा कोसळण्याच्या घटनेने आज आमची मान शरमेने खाली झुकली आहे. महाराजांचा पुतळा बांधण्यामध्ये झालेला भष्टाचार याची सखोल चौकशी करण्यासाठी दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या मान्यतेने निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणे आवश्यक आहे. राज्यात भष्टाचाराचा कळस झालेला आहे. महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती, नौदलाकडे बोट दाखवून त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. पुतळा वाऱ्यामुळे कोसळला असे म्हणत असतील तर त्यादिवशी एकही झाड मालवणमध्ये कोसळले नव्हते, फक्त पुतळ्याच्याच परिसरात वारा झाला का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांचे उत्तर योग्य नाही असे पाटील म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. राज्यातील सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. आज दोन विरोधी पक्षनेते उपस्थित असताना राजकोट किल्ल्यावर राजकीय संर्घषाची घडलेली घटना दुदैवी आहे. याबाबत आम्ही योग्य त्याठिकाणी बोलणार आहोत. या सरकाराच्या झुंडशाहीला जनताच उत्तर देणार असून विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची वाईट परिस्थिती दिसून येईल. पुतळा दुर्घटनेला जाब सरकारलाच विचारला गेला पाहिजे. याठिकाणी लोकशाही आहे की ठोकशाही हेही लवकरच समजून येईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
इव्हेंट करण्यासाठीच राजकोटमध्ये शिवपुतळा – विजय वडेट्टीवार
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले, माझ्या अंगात ताप असतानाही महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याची माहिती मिळताच मी याठिकाणी आलेलो आहे. नेहरू, गांधी यांच्या काळात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे आजही उभे आहेत. मात्र मोदींच्या राज्यात उभे राहिलेले पुतळे कोसळत असल्याने या सरकारलाही कोसळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लावण्याचे काम या सरकारने केलेले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराजांच्या नावे मते मिळविण्यासाठी व इव्हेंट करण्यासाठी राजकोटमध्ये पुतळा उभा केला होता. सुदैवाने पुतळा शिवप्रेमी असताना पडला नाही, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. आमच्या अस्मितेचे रक्षण सरकार करू शकत नसल्याने त्यांना बाहेरचा रस्ताच दाखविण्यात येणार आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये वाचाळविरांची गर्दी झाली आहे. वाचाळवीर आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. या सर्वांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची बदनामी – अंबादास दानवे
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्य शासनाकडून नौदलाची बदनामी केली जात आहे. पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाचीही जबबादारी महत्वाची होती. पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. यामुळे याप्रकरणी चौकशी होणे आवश्यक आहे. छत्रपतींचे राज्य यावे हिच श्रींची इच्छा आहे. यामुळे राज्य सरकारच्या भष्ट्राचाराची पोलखोल पुतळा दुर्घटनेतून समोर आलेली आहे. आता कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे या सरकारला बाजूला करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही दानवे म्हणाले.
यावेळी सुनील शिंदे , वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत आदींची भाषणे झाली
यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बाबी जोगी, महेश जावकर, यतीन खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर, शिल्पा खोत, सेजल परब, पूनम चव्हाण, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, सुर्वी लोणे, माधुरी प्रभू, गौरी सावंत, दत्ता पोईपकर, साईनाथ चव्हाण, नागेश मोर्ये, श्रीकृष्ण तळवडेकर, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, संदेश कोयंडे, हेमंत माळकर, आपा चव्हाण, जेम्स फर्नांडिस, श्रेयस माणगावकर, पल्लवी खानोलकर, मधुकर लुडबे, प्राची माणगावकर, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, गणेश पाडगावकर, अमृता मोंडकर, ममता तळगावकर, बस्त्याव मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, प्रवीण वरुणकर, हुस्नबनू हतीये, आदीसह बहुसंख्य शिवसैनिक व मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.
