काही सदस्यांना स्वनिधीच मिळत नाही..

संजय देसाई यांचा सत्ताधारी भाजपला घरचा आहेर;जी प वित्त समितीत व्यक्त केली नाराजी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बेकायदेशीर, मनमानीने कामे वाटप होत असल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी भाजपा सदस्य संजय देसाई यांनी करत सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. तसेच आम्ही सुचविलेली कामे होत नसतील तर आम्ही खर्चाला डोळे झाकून मंजुरी कशी काय द्यायची ? आम्ही आमच्या मतदारसंघात कामे करायची नाहीत का ? असे प्रश्न करत या निधी खर्चाला संजय देसाई यांनी प्रखर विरोध केला. तसेच या प्रकरणाची माहितीच्या अधिकारात माहिती मागणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन भिसे, समिती सदस्य संतोष साटविलकर, संजय देसाई, गणेश राणे, अनघा राणे, अधिकारी खातेप्रमुख आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद स्व उत्पन्नाच्या निधीतून विविध विकास कामे केली जातात. या स्व निधीतून बांधकाम विषयक कामांसाठी ६ कोटी २९ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला. यातून फेब्रुवारी अखेर पर्यंत अडीज कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर आता उर्वरित निधी खर्च होणार आहे. मात्र या निधीत आपल्या मतदार संघातील एकही काम नसल्याचे सांगत तसेच अन्य सदस्यांनीही सुचविलेली कामे झाली नाहीत मग हा अडिज कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च झाला? असे सांगत सदस्य संजय देसाई यांनी स्व निधी खर्चावर आक्षेप घेतला. तसेच ही कामे कोणाच्या मागणीने मंजूर झाली, कोणी मंजुरी आदेश दिले याबाबत सभेत माहिती मागितली. सभाध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांना याबाबत जाब विचारला. मात्र ही कामे आपल्या कालावधीत मंजूर झाली नसल्याचे जिप अध्यक्षा संजना सावंत यांनी स्पष्ट केले. यावर जिल्हा परिषद अध्यक्षानी कामे मंजूर केली नाहीत, मग केली कोणी? म्हणजेच जिप मध्ये बेकायदेशीर कामे होत असल्याचे स्पस्ट होत आहे. आणि आपला याला विरोध असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या ४ वर्षात बांधकाम साठी किती स्व निधी मंजूर झाला ? किती खर्च झाला आणि कोणत्या सदस्याने सुचविलेली कामे झाली याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page