उपनिबंधक सांगळे यांचे आवाहन:९ सप्टेंबर पर्यंत मुदत..
⚡ओरोस ता २२-: महाराष्ट्र शासनाचे सहकार विभागाकडील २९ जुलै २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार २०१७- १८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीतील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात अल्पमुदत शेती पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यासांठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु करण्यात आलेली होती. सद्यस्थितीत या योजनेतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाआयटी यांनी १२ ऑगस्ट २०२४ ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संबंधीत शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामिण बँका, व्यापारी बँकांचे ३८४ सभासद शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. तरी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रातून आधार प्रमाणिकरण करुन घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक एम. बी. सांगळे यांनी केले आहे.
