⚡मालवण ता.१७-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभाग आणि मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मान देशभक्तांचा, तिरंगा रॅली आणि मशाल फेरी असा तिरंगी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या मशाल फेरीत बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होत देशभक्तीपर घोषणा देत परिसर दाणाणून सोडला.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित सन्मान देशभक्तांचा या कार्यक्रमामध्ये ५८ महाराष्ट्र बटालियनचे नायब सुभेदार सुरेंद्र सिंग (उत्तर प्रदेश) आणि हवालदार प्रदीप पाटील (कोल्हापूर) या दोन्ही आर्मी ऑफिसरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नंतर ज्योती तोरस्कर यांनी या दोन्ही आर्मी ऑफिसरची मुलाखत घेतली. मुलाखतीत चीन आणि पाकिस्तान बॉर्डरचे विविध प्रसंग त्यांनी उलगडले. या प्रसंग कथनाने उपस्थित भावूक झाले. नंतर डॉ. पंकज दिघे यांचे १९४७ च्या इतिहासातून काय शिकलो, यावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात देशसेवा आपल्या घरापासून कशी करू शकतो, या संदर्भात विचार डॉ. दिघे यांनी मांडले.
त्यानंतर तिरंगा रॅली आणि मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सिंधुदुर्ग कॉलेजपासून सुरुवात होऊन मामा वरेरकर नाट्यगृह, भरड नाका, बाजारपेठ मार्गे, फोवकांडा पिंपळ, कन्याशाळा व पुन्हा सिंधुदुर्ग कॉलेज अशी काढण्यात आली. मशाल फेरीचे काटकर यांनी आपल्या घराजवळ, तर भरड नाक्यावर दीपक पाटकर, अमेय देसाई आदींनी स्वागत केले.
कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी गणेश कुशे, सीडीसीचे अध्यक्ष अॅड. समीर गवाणकर, विश्वस्त मंडळ सदस्य संदेश कोयंडे, डॉ. झाटये, मुख्याधिकारी संतोष जिरगे, समाजसेविका शिल्पा खोत व त्यांचे विविध संस्था सदस्य, माजी नगरसेवक यतीन खोत, लायन्स क्लबचे सदस्य, योग ज्योती ग्रुपच्या सर्व महिला सदस्या, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. प्रकाश शिरहट्टी व विद्यार्थी, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर, मालवण पत्रकार संघाचे पत्रकार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष दादा वेंगुर्लेकर, कॉलेजचे माजी जीएस ललित चव्हाण, अमेय देसाई, मांजरेकर, रामाडे, मालवण नगरपालिकेचे कर्मचारी, कॉलेजचा स्टाफ, विद्यार्थी उपस्थित होते. मशाल फेरीवेळी प्रा. सुमेधा नाईक यांनी युवकांना प्रेरित करणाऱ्या, देशाच्या एकात्मतेसाठी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. नागरिक व विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दंणाणून सोडला. उत्स्फूर्तपणे येथील नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.
असोसिएट, एनसीसी ऑफिसर, राष्ट्रीय छात्रसेना विभागप्रमुख, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी विद्यार्थी, सिनिअर अंडर ऑफिसर राहुल चव्हाण, संतोष तांबे, वैभव पाताडे, राहुल जाधव, मिथुन मानवर, प्रणव देऊलकर, सुनील सैनी, एनसीसी सिनिअर अंडर ऑफिसर मनाली पालव, हर्षदा पवार, सिद्धी मराठे, गौरी रेवंडकर, प्राजक्ता नाईक, पल्लवी शिंदे, दर्पणा जाधव, क्षितीजा खरवते, रेशमा पांढरे, श्रावणी कदम यांच्यासह एनसीसीचे अन्य विद्यार्थी व पालिकेचे मुख्याधिकारी जिरगे व कर्मचारी वर्ग यांनी हा तिरंगी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला होता. लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी सूत्रसंचालन केले. मशाल फेरी आणि सन्मान देशभक्तांचा कार्यक्रम साजरा करणारे सिंधुदुर्ग कॉलेज (एनसीसी विभाग) महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज आहे, असा दावा प्रा. खोत यांनी केला.
