मालवणात मूक मोर्चातून नोंदविला स्त्री डॉक्टरवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध…

मालवण (प्रतिनिधी)

कोलकाता मधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डाॅक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज मालवण शहरात मालवण मेडिकल असोसिशन च्या पुढाकारातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात मालवण मधील अनेक संघटना व संस्थांच्या प्रतिनिधीनी सहभागी होत या अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदविला. स्त्री डॉक्टरवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमांवर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोलकाता मधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डाॅक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी पुकारल्या गेलेल्या एकदिवसीय देशव्यापी बंदमध्ये आज मालवणातील डॉक्टर्स, हॉस्पिटल यांनी सहभाग घेत आज सकाळी ६ वाजल्यापासून २४ तासासाठी अतितातडीच्या सेवा वगळून वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. तसेच आज सकाळी सव्वा दहा वाजता मालवण भरड येथील लिमये हॉस्पिटल येथून मूक मोर्चा काढण्यात आला. भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार ते पुन्हा लिमये हॉस्पिटल असा हा मूक मोर्चा काढण्यात आला. डॉ. शुभांगी जोशी, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. लीना लिमये यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात मालवण मेडिकल असोसिशनचे सर्व सदस्य डॉक्टर, केमिस्ट असोसिएशनचे सदस्य, नर्सिंग स्टाफ, डीएड कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक, सौ. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या महिला सदस्य, बॅ. नाथ पै सेवांगण संस्थेचे सदस्य, नंदिनी कलेक्शनच्या सदस्या, रोटरी क्लब व लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापक, मालवण बार कौन्सीलचे वकील सदस्य, मातृत्व आधार फाउंडेशनचे सदस्य आदी व इतर संस्था सदस्य, महिला व नागरिक काळ्या फिती लावून सहभागी झाले होते.

या मोर्चाच्या वतीने बोलताना डॉ. लीना लिमये म्हणाल्या, कोलकाता येथील महिला डॉक्टरवर जो पाशवी अत्याचार करून हत्या करण्यात आली, ही अत्यंत गंभीर घटना असून याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता या अत्याचाराविरोधात जनमाणसात मोठी चीड असल्याचे दिसून येते. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे, जेणेकरून समाजात दहशत निर्माण होईल, असे कृत्य करण्याचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

You cannot copy content of this page