पालकमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर आम. वैभव नाईक हे भाजपवासी झाले असते…

धोंडी चिंदरकर यांचा दावा ; आम. नाईकांवर केली जोरदार टीका..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण कुडाळ मतदार संघात गेली दहा वर्षे आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांनी कामे न केल्याने, आमदारांनी आमसभा न घेतल्याने जनतेने गेल्या दहा वर्षातील आक्रोश जनता दरबारात व्यक्त केला. या जनता दरबारावार टीका करणारे आम. नाईक यांची पक्ष निष्ठा काय आहे ते आम्हाला माहित आहे, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आम. नाईक कितीवेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांना भेटले याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, मात्र फडणवीस यांनी त्यांना नकार दिला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रीन सिग्नल दिला असता तर आम. नाईक हे निष्ठेचे जॅकेट फेकून भाजपवासी झाले असते, असा खळबळजनक दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

मालवण कोळंब येथे आज मालवण तालुका भाजपची बैठक होऊन त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर हे बोलत होते. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, बाबा परब, सेवा प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष भालचंद्र राऊत, सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, ग्रामीण उपाध्यक्ष सुबोधिनी परब आदी उपस्थित होते.

यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, आजच्या बैठकीत तालुका कार्यकारिणीच्या नवीन नियुक्त्या जिल्हाध्यक्षांकडून जाहीर करण्यात आल्या. तसेच विकासात्मक मुद्दे व राहिलेली विकासकामे पूर्ण करणे, जनता दरबार मधील राहिलेल्या तक्रारी सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जनता दरबारात मालवण कुडाळ मधील जास्त तक्रारी होत्या. जनतेचा गेल्या दहा वर्षातील तो आक्रोश होता. मालवण कुडाळ मधील तक्रारी पालकमंत्री ना. चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी जाणून घेत अनेक प्रश्न त्याठिकाणीच सोडविले. पालकमंत्री यावरच न थांबता जे प्रश्न प्रलंबित राहिले त्यासाठी पुन्हा जनता दरबाराचे आयोजन त्यांनी केले आहे, असेही धोंडी चिंदरकर म्हणाले.

मालवण कुडाळ मध्ये एवढ्या समस्या का निर्माण झाल्या ? आमदार वैभव नाईक यांनी दहा वर्षात आमसभा घेतली नाही, त्यामुळे समस्यांचा डोंगर उभा राहिला. आम. नाईक व माजी खासदार यांनी लक्ष का दिले नाही ? अडीज वर्षापूर्वीच्या काळात आमदार वैभव नाईक सत्तेत होते, सत्तेत राहून काय केले ? आमदार नाईक यांना समस्याची यादी वाचून दाखवताना मनाला काहीतरी वाटले पाहिजे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे पाप आमचे आहे का ? मालवण एसटी स्टॅन्डच्या इमारतीचे काम रखडले आहे. हे काम होण्यासाठी आता आम्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. बारशाला, लग्नाला आणि गोंधळाला जाणे हेच आमदारांचे काम आहे का ? आम. नाईक यांनी विकासकामांना खो कसा घातला याची माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवली आहे. आम. नाईक जे प्रश्न मांडतात ते प्रश्न एक सरपंच पण मांडू शकतो. एखाद्या प्रश्नी ग्रामस्थाना उपोषण करायला आमदारच सांगतात आणि उपोषण मिटवायला देखील आमदारच सांगतात, अशी टीका धोंडी चिंदरकर यांनी केली.

You cannot copy content of this page