कोलकाता घटनेच्या निषेधार्थ उद्या जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद…

इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घटनेचा निषेध:आपत्कालीन आणि अपघात सेवा मात्र राहणार सुरु..

कुडाळ : कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या शनिवारी १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. अशी माहिती आयएमएच्या वतीने डॉ. संजय केसरे यांनी दिली आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.
डॉ. केसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार कोलकाता येथिल महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्या घटनेचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स आपले ओपीडी, नॉन इमर्जन्सी ,तसेच टाळता येण्यासारखे ऑपरेशन्स या सर्विसेस पूर्ण 24 तासासाठी बंद करणार आहेत. या कालावधीमध्ये आपत्कालीन सेवा तसेच अपघात सेवा सुरू राहणार आहेत. .
डॉक्टरांवरील हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी या आधी नॅशनल IMA मार्फत मोर्चे निवेदने तसेच जनजागृती करण्यात आलेली आहे. परंतु सरकारकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आजही वैद्यकीय मंडळी असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत आहेत. उच्चशिक्षित असूनही डॉक्टरांना सुरक्षा नाही याचा आम्ही निषेध करतो आणि या घटना तात्काळ बंद झाल्या पाहिजेत असे आवाहन IMA सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page