आस्था ग्रुपच्या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत भंडारी प्राथमिक शाळा व रेकोबा हायस्कुल प्रथम…

⚡मालवण ता.१४-: मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे आयोजित मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेने तर माध्यमिक गटात रेकोबा हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.

मालवण रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळेत आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील १३ शाळांनी सहभाग दर्शविला. प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा मालवण, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा मालवण, जि. प. शाळा कांदळगाव, कन्याशाळा प्राथमिक, तर माध्यमिक गटात टोपीवाला हायस्कूल, जय गणेश, डॉ. दत्ता सामंत स्कूल देवबाग, भंडारी हायस्कूल मालवण, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, रेकोबा विद्यालय, वायरी, कन्याशाळा हायस्कूल यांचा सहभाग होता.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्राथमिक विभाग-प्रथम -भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, द्वितीय – जिल्हा परिषद शाळा कांदळगाव, तृतीय – जय गणेश इंग्लिश स्कूल, माध्यमिक विभाग- प्रथम – रेकोबा माध्यमिक शाळा, द्वितीय – कन्याशाळा हायस्कूल, तृतीय : भंडारी ए. सो. हायस्कूल.

दुपारी स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. यावेळी परीक्षक टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय जोशी व भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांच्यासह आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी नंदकिशोर महाजन, रेवतळे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी देशमुख, शिक्षक महादेव घोडगे, स्पर्धाप्रमुख सौगंधराज बादेकर, खजिनदार बंटी केनवडेकर, सचिव मनोज चव्हाण, आगोस्तीन डिसोजा, रवी मिटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश शिरोडकर आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविकात बंटी केनवडेकर यांनी गेली १६ वर्षे आस्था ग्रुपतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना जानेवारी २०२५ मध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच पुढील वर्षी तालुका, जिल्हास्तरीय समूहगान स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी परीक्षक संजय जोशी व भालचंद्र केळूसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विजेत्यांना चषक, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रेवतळे शाळेतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात आठवी आलेली लईशा पराडकर आणि तालुक्यातील नववी व जिल्ह्यात ५१ वी आलेली मंतसा खान यांचा आस्था ग्रुपतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले.

You cannot copy content of this page