मंजूर रस्त्याबाबत अद्याप कार्यवाही नाही..
कुडाळ : तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव अंतर्गत येणार्या देणा बॅक ते जुनी शाळा नंबर 1 ( कट्टावाडी – वेताळाचे टेंब) या मंजुर रस्त्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणगाव कट्टावाडी येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थ मोहन लाड यांनी दिली आहे.
मोहन लाड यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या माणगांव शिवापूर मुख्य रस्ता ते माणगाव कट्टावाडी जुनी शाळा क्रमांक 1 हा रस्ता सन 1961 पासून माणगाव ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. सदर रस्ता ग्रामपंचायत नमुना नं. 23 नुसार 12 फुट रूंद व 6 फर्लांग लांब आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी त्यावेळी 396 रूपये खर्च केल्याची अभिलेखात नोंद आहे. असे असताना काही लोकांनी सदर रस्त्यावर अतिक्रमण करून 12 फुट रूंद रस्त्याची प्रत्यक्षात 2 फुट रूंदीची पायवाट केली आहे. या रस्त्याच्या मागे 15 ते 20 कुटूंबांची घरे असून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास, अपघात झाल्यास, गरोदर महिला व वृध्द व्यक्तींना नेण्यास रस्ता नसल्याने रहदारी करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात लोकसभा निवडणुकीवर या वाडीतील आम्ही ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी कुडाळ यांनी सदर रस्ता खुला करून देण्याचे लेखी आश्वासन त्यावेळी दिले होते. गटविकास अधिकार्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही लोकसभा निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार मागे घेतला परंतु गटविकास अधिकार्यांकडून निवडणुकीनंतर रस्ता खुला करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दि. 15 ऑगस्ट पासून आम्ही ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसत आहोत. असे नमुद केले असल्याची माहिती श्री. मोहन लाड यांनी दिली आहे. या निवेदनावर 78 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
