रामगड येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील रामगड कुंभारवाडी येथील गळाने मासे पकडण्यासाठी गुरुवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास गेलेला युवक राहूल कृष्णा जिकमडे हा बेपत्ता झाल्यावर कालपासून राहुल याचा ग्रामस्थ व प्रशासनाकडून शोध सुरु असताना आज तिसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर खडकाची कोंड येथे राहुल याचा मृतदेह सापडून आला. ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत हा मृतदेह आढळून आला. राहुल याच्या अकाली मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रामगड कुंभारवाडी येथील राहुल जिकमडे हा बारावी उत्तीर्ण झालेला १८ वर्षीय युवक गुरुवारी दुपारी गडनदीच्या किनारी गळाने मासे पकडण्यासाठी रॉड फिशिंग घेऊन गेला होता. मासे पकडायला गेल्यावर त्याला उशिरापर्यंत थांबण्याची सवय होती. गुरुवारी देखील तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे राहूलच्या आईने आणि बहिणीने त्याचा शोध घेतला होता. पण तो आढळून आला नसल्यामुळे हि बाब ग्रामस्थांना कळल्यावर शोध मोहीम राबवली गेली. गुरुवारी न सापडल्याने शुक्रवारी सकाळी शोधाशोध केली. मात्र तो सापडू शकला नाही. त्यामुळे याबाबतची खबर पोलीस व प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर एनडीआरएफ टीमला पाचारण करून त्यांच्याकडून साधारण अडीज किलोमीटर परीसरात शोधाशोध केली गेली. तसेच मालवण येथील जय बालाजी रेस्क्यू टीमला देखील पांचारण करून त्यांच्याकडून गडनदी पात्रात दोन किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम राबवली गेली. मात्र काल सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडून आला नाही. त्यावेळी घटनास्थळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, एएसआय सी आर. पडवळ, आचरा मंडल अधिकारी अजय परब, तांबे, मनोज पुजारे, रामगड तलाठी यू. एम. वजराटकर ठाण मांडून होते.

आज तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी रामगड सरपंच शुभम मठकर
पो.पा नारायण जिकमडे ,सुरेंद्र जिकमडे,अविनाश सादये,विष्णू कोळबकर.सुमेश सादये महेश पारकर.बंटी जाधव आदी ग्रामस्थांनी जेथे राहूल मासे पकडण्यासाठी गेला होता त्या भागात शोध मोहीम सुरू केली. दहा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळा पासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर खडकाची कोंड येथे ग्रामस्थांना राहूल जिकमडे याचा मृतदेह आढळून आला.

राहूल याला गळाने मासे पकडण्याचा छंद होता. तो स्वतः मासे खात नव्हता. अतिशय हुशार म्हणून राहूल ओळखला जात होता. बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेंट साठी कणकवली येथे त्याने प्रवेश घेतला होता. सात वर्षापूर्वीच वडीलांचे छत्र हरपल्याने त्याच्या आईने कष्टाने त्यांना सांभाळले होते. राहूलच्या आकस्मिक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण रामगड गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page