पाच फणांच्या नागोबाचे दीड दिवस पूजन:दोनशेहूनही अधिक काळ जोपासली जातेय परंपरा..
सावंतवाडी : सहदेव राऊळ : दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो.
श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे. पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मातीच्या नाग प्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते. मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फणांची प्रतीमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरु आहे.
वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा कै. शांताराम बंडू गोसावी व कै. रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर ही परंपरा त्यांची मुल धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश
रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंब जतन करत आहेत. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन व एकादशमी केली जाते. यावेळी कुलदेवतेची पूजा करण्यात येते. नागपंचमीच्या सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात येते. यावेळी दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर केले जातात. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी व दुपारी नागाला करंज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. सायंकाळी अळवाच्या पानात नागाचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटला केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमीला सकाळी नागाची मूर्ती आणून ती आकर्षक अशी सजविण्यात आली. त्यानंतर नागोबाचे विधिवत पूजन करण्यात आले. दुध व लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. नागपंचमीच्या निमित्ताने दुपारी गोसावी घराण्यातील महिलांचा ‘व्हवसा’ कार्यक्रम पार पडला. सायंकाळी भजन, फुगड्या आदी कार्यक्रम होणार आहेत. मळगाव तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच उपस्थिती दर्शवत दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे. उद्या शनिवारी नागोबाचे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात अळवाच्या पानात विसर्जन केले जाणार आहे. अशी ही नागपंचमीची दीड दिवशीय पूजनाची अनोखी परंपरा गोसावी घराणे जोपासत आले आहे.
