दस्ताची रक्कम शासन तिजोरीत न भरल्याचा ठेवला ठपका..
ओरोस ता ७
जमीन महसूल दस्ताची लोकांकडून वसूल केलेकी सुमारे साडेसहा लाखाच्या वरील रक्कम शासनाच्या तिजोरीत भरली नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस एम अरखराव यांना निलंबित करण्यात आले आहे.
ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस. एम.अरखराव याने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या एका वर्षामध्ये नागरिकांकडून वसूल केलेली जमीन महसूल व दस्ताची शासकीय ६ लाख ५७ हजार ४४३ रुपये रक्कम सरकार दप्तरी भरणा केली नाही. याबाबत कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलेल्या चौकशीत हा अपहार उघडकीस आला. या तलाठ्याकडे वर्दे, डिगस व आवळेगाव या गावातील अतिरिक्त कारभार होता. कुडाळ तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालानुसार कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी या आर्थिक अपहाराची तातडीने दखल घेत तलाठी एस एम अरखराव याचे सेवेतून निलंबन केले आहे. निलंबित तलाठी एस एम अरखराव यांना मालवण मुख्यालय देण्यात आलेआहे. त्यांना मालवण तहसीलदार यांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही असेही या आदेशात म्हटले आहे.
चौकट
काही गावातील तलाठ्यांच्या कामातील दिरंगाईबाबत अनेक तक्रारी आहेत, पूर परिस्थितीच्या काळातही काही तलाठी गांभीर्याने घेत नाहीत. ओरोस मध्ये मागील महिन्यात झालेल्या पूर परिस्थिती या तलाठ्याच्या कामातील दिरंगाईबाबत तक्रारी होत्या. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तलाठी व महसूल प्रशासन कामात दिरंगाई करत आहे व सर्वसामान्यांची कामे रकडून ठेवत आहे असा आरोप केला होता. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी याबाबत गंभीर दखल घ्यावी अशा सूचनाही दिल्या होत्या. याबाबत महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत अशा कामचुकार व दिरंगाई करणाऱ्या तलाठ्यांची चौकशी सुरू केली होती. त्या अनुषंगाने कुडाळ तहसीलदार यांनी केलेल्या चौकशीत ओरोस तलाठी आर्थिक अपहारामध्ये सापडले गेले.
