माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी दिला न्याय..
*💫कणकवली दि.०६-:* सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांना मागील 25 दिवस गोव्यात नो एन्ट्री होती. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सिंधुदुर्गातील वाळूचे डंपर पूर्वीप्रमाणे गोव्यात जायचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिक मोठ्या प्रमाणात गोव्यात वाळूपुरावठा करतात. सिंधुदुर्गातील दोनशेहून अधिक वाळूव्यावसायिक डंपरमालक चालक दररोज गोव्यात वाळू व्यवसाय करतात. विशेषतः कुडाळ, मालवण तालुक्यातील वाळू व्यावसायिक गोव्याला वाळूपुरवठा करतात. मात्र मागील 25 दिवसांपासून झालेल्या वादात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांच्या डंपर ना गोव्यात नो एन्ट्री होती. त्यामुळे वाळू व्यावसायिक डंपर-चालक हवालदिल झाले होते. याबाबत वाळू व्यावसायिकांनी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, आमदार नितेश राणे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे तोडगा काढण्याची मागणी केली होती. जि.प.गटनेते रणजित देसाई यांनीही हा प्रश्न राणे कुटुंबियांकडे मांडला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व वाळू व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. खासदार नारायण राणे यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. राणे आणि सावंत यांच्यात झालेल्या यशस्वी चर्चेनंतर सिंधुदुर्गातील वाळू व्यावसायिकांच्या गाड्या गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या वाळू व्यावसायिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वाळू व्यावसायिकांनी खासदार नारायण राणे यांच्यासह माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, रणजित देसाई यांचे आभार मानले आहेत.
