सर्व नागरिकांना कोरोना लस दया…

मालवण प स सभेत मागणी

मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या ऑनलाईन मासिक सभेत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती मिळाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र अत्यावश्यक दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवली, आठवडा बाजार तसेच अन्य व्यवसाय बंद ठेवले म्हणजे कोरोनाची साखळी तुटणार नाही. याउलट सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस कशी देता येईल यादृष्टीने आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी आरोग्य विभागास दिल्या. मालवण पंचायत समितीची मासिक सभा आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, विनोद आळवे, सोनाली कोदे, मनीषा वराडकर, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर, गायत्री ठाकूर, छाया परब यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी ऑनलाईन पद्धतीने या सभेस उपस्थित होते. सुरवातीस आदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापतींच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भगवंतगड बंधार्‍याचे काम अर्धवट स्थितीत ठेवल्याने संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी गटनेते सुनील घाडीगावकर यांनी केली. त्यानुसार बैठकीत ठराव घेण्यात आला. अर्धवट स्थितीतील बंधार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याला संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याने त्याच्याकडून नुकसानाची भरपाई करून घ्यावी असे अशोक बागवे यांनी सांगितले. असगणी व असरोंडी येथील रस्त्याच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला जाईल असे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे व सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले. मालवण तालुक्यात बंधार्‍यांची जी कामे झाली आहेत त्या बंधार्‍यांच्या कामांची पाहणी करून अंदाजपत्रकाप्रमाणेच बिले अदा करण्यात यावीत अशी सूचना सुनील घाडीगावकर यांनी केली. हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. गोळवण, मसुरे, आचरा याठिकाणी प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे यातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रत्येकी एक दिवस हिवाळे आरोग्य केंद्रात रुग्णसेवा द्यावी अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची आता बदली होणार आहे. तालुक्याची अवस्था पाहता विविध विभागातील अनेक पदे रिक्त असून सुरवातीस ही पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याचबरोबर ज्यांची बदली झाली आहे त्यांच्या बदली जोपर्यत येथे अधिकारी, कर्मचारी येत नाहीत. तोपर्यत त्या कर्मचार्‍यांना कार्यमुक्त करू नये असा ठराव सुनील घाडीगावकर यांनी मांडला. त्यानुसार याबाबतची कार्यवाही केली जाईल असे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page