शिल्पा खोत: नगरपालिकेकडे केली मागणी..
⚡मालवण ता.०७-: मालवण शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. यामुळे नागरिक, वाहनचालक यांना होणारा त्रास लक्षात घेता तसेच आगामी गणेशोत्सव, सण उत्सव कालवधी पाहता रस्ते सुस्थितीत करावेत. खड्डेमय रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी, याबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख सौ. शिल्पा यतीन खोत यांनी मालवण नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन माध्यमातून केली आहे.
मालवण नगरपालिकेच्या अधिकारी सोनाली हळदणकर यांना रस्त्यांच्या दुर्दशेबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शिल्पा खोत, नंदा सारंग, प्रतिभा चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, अश्विनी आचरेकर, साक्षी मयेकर, स्वाती तांडेल, मानसी घाडीगावकर, ज्योती तोडणकर, तन्वी भगत, दीपा पवार, प्रियांका लाड, निकिता केळूस्कर यांसह अन्य महिलां उपस्थित होत्या.
मालवण शहरातील बांगीवाडा समाज मंदिर रोड, पांजारीवाडा (भरड) काँक्रिटीकरण आदी प्राधान्य क्रम ठेवून अन्य सर्व खड्डेमय रस्ते प्राधान्यक्रम ठरवून गणेशोत्सव पूर्वी सुस्थितीत करून घ्यावेत, अशी मागणी यावेळी शिल्पा खोत यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली.
