पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे पैसे१२ ऑगस्ट पर्यंत खात्यात जमा न केल्यास आंदोलन…

जावेद खतीब:महसूल अधिकाऱ्यांना घेरावो घालत विचारला जाब..

बांदा ता.०५-: शासन स्तरावर पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे पैसे येऊनही महसूल विभागाकडून लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने आज भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा बांद्याचे माजी उपसरपंच जावेद खतीब व गुरुनाथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली महसूलचे अधिकारी समर्थन पेठे यांना घेरावो घालत जाब विचारण्यात आला. यावेळी १२ ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यात वर्ग न केल्यास ३०८ लाभार्थ्यांना सोबत घेऊन सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा खतीब यांनी यावेळी दिला.

२०१९-२० मध्ये बांदा, इन्सुली, शेर्ले, वाफोली येथे आलेल्या महापुरात शेकडो व्यापारी व घरांचे नुकसान झाले होते. एकूण ३६६ जणांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेत. या लाभार्थ्यांना शासन स्तरावरून नुकसान भरपाईची रक्कम देखील प्राप्त झाली आहे. मात्र सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातून ही रक्कम वर्ग करण्यासाठी चालढकल होत आहे. लाभार्थ्यांनी कित्येकवेळा याठिकाणी येऊन पाठपुरावा केला, मात्र खात्यात रक्कम वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत होती. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने श्री खतीब व श्री सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात धडक देत जाब विचारला.
यावेळी ३६६ पैकी ५८ जणांना भरपाई वर्ग करण्यात आल्याची माहिती श्री पेठे यांनी दिली. त्यामुळे लाभार्थी अधिकच आक्रमक झालेत. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून लवकरात लवकर भरपाईची रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त लाभार्थ्यांची यादी तयार असून टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन अधिकारी पेठे यांनी दिले. तसेच १२ ऑगस्ट पर्यंत रक्कम वर्ग न केल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नुकसानग्रस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page