महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे:जिल्ह्याचे संपूर्ण आधुनिक सर्वेक्षण ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार..
⚡कणकवली ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि कृषी क्षेत्रात मोठी क्षमता असलेला जिल्हा असून, त्याला राज्यातील आदर्श जिल्हा बनविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याला बदनाम करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. या प्रकरणी कोणत्याही चौकशीची आवश्यकता असल्यास ती निश्चितपणे केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल; मात्र प्रामाणिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभे राहील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्यासोबत आलेल्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणेचे यशस्वी आयोजनाबद्दल विशेष कौतुक करून सर्वांचे आभार मानले.
कणकवली तहसील कार्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अंतर्गत लाभ वाटप आणि निवेदन स्वीकृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, सभापती हर्षदा वाळके, समाज कल्याण सभापती रुहीता तांबे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार अजित गोगटे आणि दादा साईल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत लाखो कुटुंबांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. कणकवलीतही नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सरकारच्या विविध निर्णयांचा आढावा घेताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीपंपांची वीजबिल माफी, महिला शेतमजुरांना शेतकरी दर्जा, मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबाबत माहिती दिली.
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने या क्षेत्राला पीककर्ज, अनुदान आणि इतर कृषी योजनांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतरस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटविणे व क्रमांक देण्याचे काम पूर्ण केले जाईल. मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून शेतरस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार असून, एकाही शेतकऱ्याला रस्त्याविना राहू दिले जाणार नाही. तसेच १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागांवर असलेल्या घरांचे सर्वेक्षण करून पात्र ठिकाणी पट्टे देण्यात येतील आणि १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील लेआउटमध्ये बांधण्यात आलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्याचे संपूर्ण आधुनिक सर्वेक्षण ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार असून, प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येईल. भविष्यात लँड टायटिलिंग कायदा लागू करून प्रत्येक मालमत्तेला शासनमान्य निश्चित मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगत नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतरच फेरफार करण्याची नवीन व्यवस्था लागू करण्यासाठी कायदा आणला जाणार आहे.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. मत्स्य व्यवसाय विभागात मंत्री नितेश राणे यांनी ऐतिहासिक कामगिरी करत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून दिल्याचे सांगत, नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे वचन देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे आणि त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असे सांगत कोकण दौऱ्यावर याण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात महसूल मंत्र्यांनी प्रशासकीय कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत कडक आदेश दिले. शिबिरात एकूण १३५ निवेदने आली असून त्यातील १० टक्के निवेदने शासन स्तरावरील आहेत, तर ९० टक्के निवेदने जिल्हा पातळीवर सोडवता येण्यासारखी आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी त्यांनी लोकाभिमुख काम केले असते, तर लोकांना मंत्र्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्याची वेळ आली नसती. ही निवेदने येणे हे योग्य नाही. १३५ निवेदने येणे हे प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नाही. सर्वांचे समाधान करायचे आहे. पुढच्या महिन्यात मी पुन्हा जिल्ह्यात येणार आहे, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आलेली सर्व निवेदने तातडीने मार्गी लावायची आहेत. तात्काळ निर्णय घ्या. पुढच्या महिन्यात मी दौऱ्यावर येईन, तेव्हा अशी निवेदने येणार नाहीत याची काळजी घ्या. दरम्यान त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आदर्श घेण्याची सूचना करत, नियमित दौरे करा, नागरिकांशी संवाद साधा, लोकांचे म्हणणे ऐका आणि जनतेला वेळ द्या. दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवा. गव्हर्नमेंट लेव्हलच्या कामांना वेळ लागेल, पण ती कामेही निश्चित करू, असा विश्वास नागरिकांना द्या, असे स्पष्ट निर्देश देऊन महसूल मंत्र्यांनी प्रशासनाला गतिमान होण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा सविस्तर आढावा मांडला. त्या म्हणाल्या की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ८ लाख ४९ हजार ६५१ आहे. जिल्ह्याची प्रशासकीय रचना तीन महसूल उपविभाग, आठ तालुके, ७५९ महसूल गावे, ४३२ ग्रामपंचायती, ५७ महसूल मंडळे आणि ३४२ सजांमध्ये करण्यात आली असून देवगड येथे नवीन महसूल उपविभाग प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल वर्ष २०२५-२६ मध्ये नागरिकांना अधिकाधिक महसूल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील गिळे गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कबुलायदर गावकर जमिनीचा प्रश्न मार्गी लावून २३० गावकऱ्यांना शेती व वाणिज्य प्रयोजनासाठी जमिनीचे वाटप आणि सातबारा देण्यात आला. ‘शाळा तिथे दाखला’ या विशेष उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वय व अधिवास दाखले, तर सुमारे ७,८७८ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून १,४२० शाळांमध्ये १०० टक्के दाखला वितरण पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग नगरी या नवीन महसुली गावाची निर्मिती करून तेथील भूखंडधारकांना सातबारा वितरित करण्यात येत असून ई-फेरफार प्रणालीमुळे फेरफार नोंदी निकाली काढण्याचा जिल्ह्याचा कालावधी राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. महसूल वसुलीत जिल्ह्याने विक्रमी कामगिरी करत २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ८१ कोटी ७८ लाख ९८ हजार रुपयांची वसुली केली असून, ही आतापर्यंतची सर्वोच्च वसुली ठरली आहे. जनगणना २०२७ च्या तयारीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर असून ३२ गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण केली आहे, तसेच १०० टक्के घरगणना पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने मान मिळविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महसूल स्वराज्य अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ४६० लाभार्थ्यांना विविध महसूल सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून ग्रामपंचायतींना रस्त्यासाठी विनामूल्य शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासह विविध लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार ८६४ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला, ज्यामध्ये ५,९३७ महिला लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्रे, तर आरोग्य विभागामार्फत ५,८१२ नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला. याशिवाय सर्व महसूल गावांचे अद्ययावत गावनकाशे तयार करून महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. प्रास्ताविकाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि परिणामकारक झाले असून, भविष्यातही नागरिककेंद्रित सेवा अधिक प्रभावीपणे देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश यांनी आपल्या भाषणादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीचे जाहीरपणे कौतुक केले. ते म्हणाले, महसूल विभागात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उभारलेला पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हा राज्यातील मंत्र्यांसाठी आदर्श आहे.
ना. राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करताना महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली. महसूल विभागाशी संबंधित प्रत्येक निर्णय केवळ मंत्रिमंडळात मंजूर करून घेणेच नव्हे, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो, त्यामुळे जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणाऱ्या मोजक्या मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
‘महसूल पर्व’ या पुस्तकाचा उल्लेख करत ना. राणे म्हणाले, क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रत्येक निर्णय आणि कामाची माहिती जनतेसाठी उपलब्ध करून देत बावनकुळे यांनी प्रशासनात पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण केला असून जनतेची खरी सेवा कशी करावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बावनकुळे यांचे कार्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग व पर्यटन प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी आवश्यक महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यात बावनकुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगत देवगडमध्ये ताज समूहाचा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला त्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा उल्लेख केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “हा तुझा नाही, माझाही ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे बावनकुळे यांनी सांगितल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली.
भूमाफियांच्या मुद्द्यावर बोलताना ना. राणे यांनी सिंधुदुर्गची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील जमीन व्यवहार कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने होत असून, रोजगारनिर्मितीसाठी उद्योगांना चालना देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात मोठे उद्योग उभारल्यास रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर शहरांकडे गेलेले तरुण पुन्हा आपल्या गावात परत येतील आणि स्थानिक पातळीवरच चांगल्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार निलेश राणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर ही संकल्पना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची असून, या अभिनव उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजना थेट मिळत आहेत. या उपक्रमाला सिंधुदुर्गसह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी हॉलही अपुरे पडले, यासाठी त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून अभिनंदन केले. कणकवलीतील या शिबिरामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळाली, अनेक नवीन लाभार्थी तयार झाले आणि नागरिकांनी महायुती सरकारवर विश्वास व्यक्त केला असल्याचे ते म्हणाले. विधानसभेत मांडलेल्या सिंधुदुर्गच्या विविध प्रश्नांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अनेक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दोन्ही मंत्र्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकारी पड आणि वनसंज्ञा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. सॅटेलाईट सर्वेक्षणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणाखाली गेल्या असून, त्यासाठी तातडीने पुनर्सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तत्काळ बैठक घेऊन पुनर्सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा भाग इको सेन्सिटिव्ह झोन, आकारी पड, वनसंज्ञा आणि सीआरझेडसारख्या विविध आरक्षणांमुळे विकासापासून वंचित राहिला असल्याचे सांगत, या सर्व प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. गावठाण जमिनी, गावित व भंडारी समाज तसेच किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या नावावर जमिनी करण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सावंतवाडी मतदारसंघातील कबुलतदार गावकरांचा प्रश्नही शासनाने प्राधान्याने सोडवावा, अशी मागणी करत वनसंज्ञा, वनविभाग आणि महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी विनंती केली आणि पालकमंत्री नितेश राणे या विषयावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. वाळू धोरण, रॉयल्टी आणि खाण व्यवसायाला कायदेशीर चौकट देण्याची आवश्यकता व्यक्त करताना महसूल विभागाने प्रकाशित केलेल्या “महसूल पर्व” या पुस्तिकेचे त्यांनी विशेष कौतुक केले. या पुस्तिकेत विविध सेवांसाठी क्यूआर कोड देण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांना माहिती सहज उपलब्ध होत असल्याचे सांगत इको सेन्सिटिव्ह झोन, मायनिंग, वाळू आणि रॉयल्टी यासंदर्भातील प्रश्नांवर शासनाने लवकर निर्णय घेतल्यास सिंधुदुर्गच्या विकासाला मोठी चालना मिळेल आणि जिल्ह्यातील नागरिक हे काम कायम स्मरणात ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भाषणादरम्यान एक हलकाफुलका प्रसंग घडला आणि सभागृहात पिकला हशा. भाषणादरम्यान आमदार निलेश राणे यांनी विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांच्याकडे मिश्कीलपणे पाहत हलक्याफुलक्या शैलीत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. महसूल विभागाने प्रकाशित केलेल्या “महसूल पर्व” या पुस्तिकेचे कौतुक करताना ते म्हणाले की, प्रमोद जठार साहेब, कोकणात जास्त काम नाही असं पुन्हा कधी म्हणू नका. मंत्री महोदय रोज-रोज भेटत नाहीत, आता त्यांच्या कामांची माहिती या पुस्तिकेत आणि फोटोमध्येही पाहता येईल. त्यांच्या या मिश्कील वक्तव्यावर व्यासपीठावर एकच हशा पिकला.
विधानपरिषद आमदार प्रमोद जठार म्हणाले, कोकणातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले महसुली प्रश्न सोडविण्याची क्षमता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील अनेक प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील. रायगड आणि रत्नागिरी दौऱ्यात महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून महसूल खाते कसे चालवावे याचा आदर्श त्यांनी राज्यासमोर ठेवला असल्याचे जठार म्हणाले. नागरिकांनी दिलेल्या निवेदनवर ते तातडीने निर्णय घेत असून, संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश देत आहेत. कोकणातील महसुली प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेका उल्लेख केला आणि कोकणाला निधीची कमतरता नसून महसुली अडचणी दूर झाल्यास विकासकामांना अधिक गती मिळेल, असे सांगितले. महसूल विषयांचा आपण सखोल अभ्यास केला असल्याचे सांगताना जठार यांनी विनोदी शैलीत, साहेबांना कधी सुट्टी घ्यायची वेळ आली, तर महसूल खात्याचे नियम मीही सांगू शकेन, असे वक्तव्य करत उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकवला.
कोकणातील साकवांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांच्या जागांचे संपादन करून नव्याने साकव उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शेती आमदार प्रमोद जठार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत कोकणातील प्रलंबित महसुली प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.
