सावंतवाडी तालुक्यात मेघगर्जनेमुळे नागरिकांची धावपळ…

*💫बांदा दि.०६-:* गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे काहींसा दिलासा मिळाला. दुपारी 3 वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे उष्मा कमी झाला. बांदा दशक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यातील अनेक ठिकाणी काहीवेळ थंड झुळुझुळू वारा व पावसाचा शिडकावा झाल्याने पल्लवित झालेल्या आशा अखेर मावळल्या. गेल्या दोन दिवसांपासून जमा होणाऱ्या ढगांनी हुलकावणी दिल्याने बळीराजाची धावपळ मात्र सुरू झाली आहे. मडुरा पंचक्रोशीसह बांदा दशक्रोशीत दुपारी 3 वाजल्यापासून मेघगर्जनाना सुरुवात झाली. पाऊस येणार या भीतीने बळीराजाची सुके गवत वाचविण्यासाठी झालेली धावपळ पाहायला मिळाली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा कमी झाला होता. मंगळवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण झाले होते. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. काही वेळ पावसाचा हलकासा शिडकाव झाला. ढगांचा गडगडाट झाल्यामुळे पाऊस बरसणार म्हणून नागरिक सुखावले होते, मात्र संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पावसाळी वातावरण होते. सावंतवाडीतील तापमानाचा पारा वाढता असून गेले दोन महिने उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अचानक झालेल्या गर्मीमुळे आजाराची लक्षणंही उद्भवू लागली आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली असून ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे.

You cannot copy content of this page