⚡मालवण ता.०५-: मालवण एसटी आगाराचे आगारप्रमुख सचेतन जयराम बोवलेकर (वय ५७, रा. धुरीवाडा मालवण) यांचे अल्पशा आजाराने पणजी येथील रुग्णालयात आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एसटी कर्मचारी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सचेतन बोवलेकर हे गेले काही दिवस आजारपणाने त्रस्त होते. काल रविवारी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच एसटी कर्मचाऱ्यांनी पणजी गोवा येथे जात अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बोवलेकर हे सच्चू या नावाने सुपरिचित होते. मालवण एसटी आगारातून जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी बोवलेकर यांचा सतत प्रयत्न असे. आगारप्रमुख असूनही सर्वच कर्मचाऱ्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एसटी निवृत्त अधिकारी राजाराम बोवलेकर यांचे ते मुलगे तर एलआयसी विभागातील अधिकारी सतेजा बोवलेकर यांचे पती होत.
