शरद पवार राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
सिंधुदुर्गनगरी ता ५
महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करावे व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत ८ टक्के आरक्षण द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्ग च्या वतीने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष जवाद हुसेन खतीब यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्ग चे अध्यक्ष जवादहुसैन खतीब यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने आज जिल्हाधिकारी याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सामाजिक आर्थिक ,शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. शासनाने वेळोवेळी गठीत केलेल्या समितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दिसून आला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आणि प्रबोधनाची गरज आहे. डॉ मोहम्मद उर रेहमान समितीने मुस्लिम समाजाचे दारिद्र्यरेषेचे प्रमाण, नोकऱ्यांमध्ये शासकीय वाटा, आधीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडे अहवाल देऊन काही शिफारसी सुचविल्या होत्या .डॉ रेहमान समितीने महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे विदारक चित्र अहवालात मांडले होते.
सन २०१३ मध्ये सादर केलेल्या या अहवालात समितीने मुस्लिम समाजाला ८ टक्के आरक्षणाची शिफारस केली आणि आरक्षण आवश्यक असल्याचे सांगितले होते .त्या आधारे सन २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजासाठी ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. सध्या कार्यरत असलेल्या सरकारने मुस्लिम हितासाठी सर्वेक्षण करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता .मात्र संबंधित निर्णय होऊन दोन वर्षे झाली तरी अद्याप पर्यंत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. मुस्लिम समाजात मोठ्या संख्येने अशिक्षितपणा, बेरोजगारी, गरिबी आहे. एकंदर समाजाचा विचार करता हा समाज सर्वच क्षेत्रात मागास आहे. तरी मुस्लिम समाजाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करावे व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ८ टक्के आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभाग सिंधुदुर्गचे सचिव अंत्योनी फर्नांडिस, अबुबकर शहा, तौसिक आगा, इलियास आगा, सकीना खान आदी उपस्थित होते.
