ठेकेदार आणि अधिकारी मुजोर झाल्यामुळे लोक अंधारात…

जनतेसाठी रुपेश पावसकर यांचा सरकारला घरचा आहेर:जि प आणि प स निवडणूक लवकर घेण्याची मागणी..

⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या वीज प्रश्न फार गंभीर झाला आहे. याला कारणीभूत महावितरणचे मुजोर ठेकेदार आणि अधिकारी आहेत, असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी करून आपल्याच सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत घरचा आहेर दिला आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका देखील शासनाने लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.


गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार विजेचा लपंडाव पाहायला मिळतो. काही काही गावे, वाड्या १५-१५ २०-२० दिवस अंधारात असतात. गेल्या वर्षी बसविलेले वीज पोल यावर्षी कोसळतात. त्यामुळे लोकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. महावितरणंचे मुजोर ठेकेदार आणि मुजोर अधिकारी यासाठी जबाबदार आहेत. हे अधिकारी आणि ठेकेदार एका मोठ्या अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये बसून रिंग करून कामे वाटून घेतात. कामे करण्यात मनमानी करतात. कुडाळमध्ये याचा फार फटका बसतो आहे. असा आरोप रुपेश पावसकर यांनी केला आहे.
त्याच प्रमाणे गेले सव्वा दोन वर्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका रखडल्या आहेत. त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत. तरी शासनाने या निवडणुका देखील लवकरात लवकर घ्याव्यात मागणी श्री. पावसकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page