⚡बांदा ता.३१-: गोवा राज्यातील जोस्विंन परेरा या महिला रुग्णाला गोवा बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या ए निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या पाच रक्तदात्यांनी रक्तदान करत जीवदान दिले.
या महिलेची ही तिसरी बायपास शस्त्रक्रिया होती. यासाठी सहा ते सात रक्तदात्यांची गरज होती. मात्र सदर महिलेचा रक्तगट दुर्मिळ असल्याने एवढे रक्तदाते एका दिवसात शोधणे नातेवाईकांपुढे आव्हान होते. अशातच एका स्थानिक व्यक्तीने आठ रक्तदाते उपलब्ध करून देण्याकरिता नातेवाईकांकडून पैसे घेतले आणि दुसऱ्या दिवशी मोबाइल फोन स्विच ऑफ करून ठेवला त्यावेळी नातेवाईकांच्या लक्षात आले की त्यांची फसवणूक झाली आहे.
त्यानंतर नातेवाईकांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो यांच्याशी संपर्क साधला. श्री ब्रिटो यांनी नातेवाईकांना धीर देत रक्तदाते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
ब्रिटो यांनी त्यांचे सहकारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, जिल्हा सहखजिनदार अमेय मडव आणि गोवा समन्वयक संजय पिळणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच रक्तदात्यांशी संपर्क साधत केवळ अर्ध्या तासात दुर्मिळ रक्तगटाचे पाच रक्तदाते उपलब्ध करून दिलेत.
सदर महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी मंगळवार दिनांक ३० जुलै रोजी नितिन परब-तळवडेकर (मातोंड, वेंगुर्ला) यांनी त्यांचे वैयक्तिक १२ वे, पराग पडवळ (शिरोडा, वेंगुर्ला) यांनी २१ वे, साई कदम (वेताळबांबर्डे, कुडाळ), सुमित राणे (रेडी, वेंगुर्ला) यांनी २२ वे रक्तदान केले. तसेच समीर पाटकर (मालवण) यांनी पहिलेच प्लेटलेटदान केले तर यापूर्वी त्यांनी १२ वेळा रक्तदान केले आहे. या केससाठी दिगंबर मायबा (मालवण) हे सुद्धा रक्तदानास गेले होते, मात्र तांत्रिक कारणास्तव त्यांना रक्तदान करता आले नाही. नातेवाईकांमार्फत जेफिन जॉर्ज (गोवा) यांनी रक्तदान केले.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या मागर्दशनाखाली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने यापूर्वीही सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथील रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध करून देऊन रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत २५० पेक्षा जास्त रक्तदान शिबीरे आयोजित केली आहेत तसेच सुमारे ८०० पेक्षा अधिक ऑन कॉल रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत. प्रतिष्ठानने १४ थॅलेसेमियाग्रस्त बालके दत्तक घेतली असून त्यांना रक्ताची थोडीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाते. तसेच रक्तदाते उपलब्ध करण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
कोट :-
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेची सुविधा होणे आवश्यक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक रुग्ण हे बायपास शस्त्रक्रियेसाठी गोवा बांबोळी येथे उपचारासाठी दाखल होतात. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्यास रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी ज्या वैद्यकीय सुविधा आवश्यक आहेत त्या शासकीय वैद्यकीय कॉलेज, सिंधुदुर्ग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी पाठपुरावा करून देणे गरजेचे आहे. सदर शस्त्रक्रिया जिल्ह्यात उपलब्ध झाल्यास या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्तदात्यांची सिंधुदुर्ग मधून गोवा येथे होणारी धावपळ थांबेल. तसेच लवकरात लवकर उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचवू शकतील.
— अमेय मडव, रक्तमित्र (कणकवली)
