मत्स्य विभागाची कारवाई : ट्रॉलरवर एलईडी दिवे, जनरेटर तसेच विविध प्रकारची मासळी सापडली
मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाने रत्नागिरी येथील पकडलेला ट्रॉलर पळून गेल्याने मत्स्य विभागाच्या कारभारावर मच्छीमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच मत्स्य विभागाने कारवाईची मोहीम सुरूच ठेवून शिरोडा समोरच्या वीस वाव समुद्रात आढळलेला गोव्यातील एक एलईडी ट्रॉलर पकडला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने काल मध्यरात्री पकडलेला हा ट्रॉलर आज येथील बंदरात आणून अवरूद्ध करण्यात आला. ट्रॉलरवर एलईडी दिवे, जनरेटर तसेच विविध प्रकारची मासळी सापडली आहे. दरम्यान, संबंधित ट्रॉलरमालकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तसेच त्यांचा मासेमारीचा परवाना रद्द करण्यासाठी वेंगुर्ले तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल केले जाणार असल्याची माहिती प्रभारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचार्यांच्या पथकासह काल मध्यरात्री वेंगुर्ले समुद्रात शीतल गस्तीनौकेद्वारे गस्त घालण्यास रवाना झाले. त्यांना शिरोडा समोरच्या समुद्रात वीस वाव अंतरावर एक ट्रॉलर दिसून आला. त्यांनी तेथे जात ट्रॉलरची तपासणी केली असता ट्रॉलरवर खलाशी, पागी व तांडेल असे मिळून २६ कामगार असल्याचे दिसून आले. ट्रॉलरवर जनरेटर, सात एलईडीचे दिवे, पर्ससीनचे जाळे तसेच बांगडा, बळे, म्हाकुल, कापी यासह विविध प्रकारची मासळी सापडून आली. त्यानुसार मत्स्यव्यवसायच्या पथकाने हा ट्रॉलर जप्त करण्याची कार्यवाही केली. हा ट्रॉलर गोव्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधित मालकास ट्रॉलर अवरूद्ध करण्याची नोटीस बजावत हा ट्रॉलर आज सकाळी येथील बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आला. या ट्रॉलरवर एलईडी, पर्ससीनची जाळी सापडून आल्याने या ट्रॉलरवर पाच पट दंडात्मक कारवाई व्हावी. त्याचा मासेमारीचा परवाना रद्द करण्यात यावा यासाठी वेंगुर्ले तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल केले जाणार असल्याची माहिती श्री. मालवणकर यांनी दिली. दरम्यान ट्रॉलरवर सापडलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया करण्यात आली. हा लिलाव १ लाख १ हजार रुपयांना झाला. एलईडीच्या मासेमारीस केंद्र व राज्य शासनाची बंदी आहे. या ट्रॉलरवरून मासेमारी करण्यात आली तसेच आणखी मासेमारी केली जाणार होती हे दिसून आले. शासनाने मत्स्यव्यवसाय विभागास अंमलबजावणीसाठी चार अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरीत्या मासेमारी करणार्यांवर कडक कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे, असेही मालवणकर यांनी सांगितले.
