महावितरणने गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती केल्या नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन घेतल मागे…
⚡बांदा ता.२९:- निगुडे गावाला स्वतंत्र वायरमनच्या मागणीसाठी निगुडे ग्रामस्थांनी बांदा महावितरण कार्यालयात ठिय्या मांडला आहे. गेले आठ दिवस लाईटचा खेळखंडोबा सुरू आहे. गावासाठी स्वतंत्र वायरमन देत नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर पडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव व कर्मचाऱ्यांशी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर आक्रमक ग्रामस्थांपुढे नमते घेत महावितरणने गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती केली. त्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
निगुडेसह दशक्रोशीतील गावांमध्ये सध्या वीज पुरवठा रामभरोसे सुरू आहे. अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना रात्री काळोखात काढाव्या लागत आहेत. विजे अभावी नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. वारंवार याबाबत समज देऊनही कारभारात सुधारणा न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शिवाय गावात वायरमन नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अभियंता यादव यांना धारेवर धरले. दोन महिने लाईट नाही आणि बिले वाढीव कशी देता असा सवाल उपस्थित केला. लाईनमन उद्धट वागणूक देत असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांशी जोरदार बाचाबाची झाली. यावेळी सेक्शन १ चे सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांना शांत केले.
जोपर्यंत वायरमन देत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला. अखेर वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून निगुडे गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती तत्काळ करण्यात आली. यावेळी सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच समीर गावडे, दिनेश राणे, आत्माराम गावडे, जयराम गवंडे, उपसरपंच गौतम जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबू म्हाडगुत, अनिल जाधव, किशोर जाधव, आप्पा गावडे, धनंजय गवंडे, विष्णू गवंडे, राजन गावडे, अभिजित पवार, शशिकांत गावडे, शामराव म्हाडगुत, शैलेश म्हाडगुत, पंढरी राणे, अक्षय पोखरे, प्रताप गावडे, सुधीर शेलटे, सुरेश मयेकर, राजन मयेकर, मडूरा माजी ग्रा. पं. सदस्य शशिकांत परब, शेर्लेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
