मालवण न प प्रशासन व नगराध्यक्षाच्या मनमानी विरोधात सुरु केले आंदोलन
*💫मालवण दि.०५-:* मालवण नगरपालिकेचा मनमानी पद्धतीने गैरकारभार सुरू असून विविध प्रश्नांबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अपयशी ठरल्याचा आरोप करत मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी पूर्व इशाऱ्यानुसार सोमवारी सकाळपासून मालवण नगरपरिषदे समोर आमरण उपोषण छेडले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. तर दिवसभरात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोणीही उपोषणकर्त्याची भेट घेतली नाही. मालवण नगरपालिकेच्या मनमानी व गैरकारभारा विरोधात उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्या पत्रानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्याधिकाऱ्यां कडून कोणतीही कारवाई न झाल्याने वराडकर व कुशे यांनी ५ एप्रिल रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून नगरपालिकेसमोर राजन वराडकर व गणेश कुशे यांनी उपोषण सुरू केले. मालवण नगरपरिषद भाजी मार्केट गाळा क्रमांक -१ तात्काळ खाली करून तो पाडावा, श्रीमती सुजाता उमेश केणी याना स्वतंत्र वीज मीटर घेण्याकरिता स्वतंत्र घर नंबर घेण्यात यावा. स्विमिंगपुल व ट्रेंनिग सेंटर बाबतचे कृ. सी. दे शिक्षण संस्थेने दिलेले पत्र जाणीवपूर्वक गहाळ केले गेले, ते पत्र संस्थेकडून मागून नमूद मुद्द्यांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार तात्काळ देण्यात यावे, भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने वेळोवेळी मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली आहे. त्यावर कडक कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच त्याने सादर केलेली कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नये, या आपल्या मागण्या असल्याचे उपोषणकर्ते वराडकर व कुशे यांनी यावेळी सांगितले. नगरपालिकेत नियमांचे उल्लंघन करून कारभार सुरू असल्याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्याचे कोणतेही उत्तर आम्हाला मिळालेले नाही. मालवण शहरात जनतेच्या जिव्हाळ्याचे असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत याची उत्तरे सभागृहात ना प्रशासन, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडून दिली जात नसल्याने आणि सभागृहात वारंवार लोकप्रतिनिधींचा आवाज दडपला जात असल्याने आम्ही हे उपोषण करत आहोत, असे राजन वराडकर म्हणाले. तर नगरपालिकेत सुरू असलेल्या गैरकारभाराबाबत नगराध्यक्ष मूग गिळून गप्प आहेत, त्यांना हा कारभार दिसत नाही, सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि जनतेला वेगळा न्याय नगराध्यक्ष देत आहेत अशी टीका यावेळी गणेश कुशे यांनी केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाऊ सामंत यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला. मात्र नगराध्यक्ष तसेच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अथवा अन्य अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची दिवसभरात भेट घेतली नाही.
