रवींद्र फाटक:इच्छूक सर्वच, पण मुख्यमंत्री देतील तो उमेदवार..
⚡कुडाळ ता.२५-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमचे नेते आहेत तर भाजपचे राजन तेली हे आमचे मित्र आहेत त्यामुळे सावंतवाडीतून कोण लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीतल्या केसरकर-तेली वादावर रवींद्र फाटक याना विचारले असता ते बोलत होते. श्री.फाटक यांनी आज कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. कुडाळ मालवण हा मतदार संघ शिवसेनेचा आहे त्यामुळे आमचा त्यावर दावा निश्चित आहे असे फाटक म्हणाले. तसेच निवडणूक लढवण्यासाठी सर्वच इच्छूक आहेत पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे फाटक यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्या अनुशंघाने शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी आज सकाळी मालवण मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांनतर कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये श्री. फाटक यांनी कुडाळ तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक बाळा चिंदरकर, दीपक पेटकर, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर उपस्थित होते.
राजन तेली हे माझे मित्र आहेत तर मंत्री दीपक केसरकर हे आमचे नेते आहेत. निवडणुकीसाठी इच्छूक असणे हा काही गुन्हा नाही. पण अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतील. माझ्या माध्यमातून मला जो रिपोर्ट द्यायचा तो मी देईन असे श्री. फाटक यांनी केसरकर-तेली वादावर बोलताना स्पष्ट केले. दीपक केसरकर यांनी लोकसभेवेळी नारायण राणे यांचे काम केले. म्हणूनच राणे यांना सावंतवाडीतून मोठे मताधिक्य मिळाले. काम केले नसते तर मताधिक्य मिळाले नसते. असे श्री. फाटक यांनी सांगितले.
कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचा उमेदवार असला तरी हा मतदार संघ शिवसेनेचा असल्याने या ठिकाणी आमचा दावा निश्चितच असेल. पण याबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि नारायण राणे घेतील. त्यांनतर जो महायुतीतील उमेदवार असेल तो आम्ही निवडून आणणार, पण शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभेला आणि भाजपला मदत केली त्यामुळे विधानसभा शिवसेनेला मिळवी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यासाठीच पाहणी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत असे श्री. फाटक यांनी सांगितले. महायुतीचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला बंधनकारक आहे. उद्या विधानसभा आम्हाला मिळाली तर भाजपने आमचे काम करायचे आहे पण भाजपला हि सीट सुटली तर आम्ही भाजपचे काम करणार असे श्री. फाटक यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार धुसफूस असतेच असे सांगून महिला जिल्हा जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर या आमच्या सोबतच आहेत असे सांगितले. लोकसभेच्या वेळी पण आपले नाव चर्चेत होते आणि आतासुद्धा विधानसभेला कुडाळ मालवण मधून आपल्या नावाची चर्चा सुरु आहे याबाबत बोलताना श्री. फाटक म्हणाले कि, मी या ठिकाणचा संपर्कप्रमुख आहे आणि सध्या तेच काम मी करत आहे. आमदार वैभव नाईक निष्ठा यात्रा काढतात ते त्यांचे काम आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून योजना लोकांपर्यंत नेण्याचे काम करत आहोत, असे ते म्हणाले.
निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणे हा काही गुन्हा नाही. रुपेश पावसकर हे इच्छूक आहेत तर त्यांचे सुद्धा नाव इच्छूकांच्या यादीत दिले जाईल. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. असे एका प्रश्नाच्या उत्तरावेळी श्री. फाटक यांनी सांगितले.
