गुरुची शिकवण आपल्या आचार विचारांमध्ये कायम ठेवावी…

रघुनाथ शेवडे :टोपीवाला हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी..

⚡मालवण ता.२१-: आषाढी पौर्णिमेला व्यास मुनींचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा म्हणतात. आपल्या जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे असून गुरुची शिकवण आपल्या आचार विचारांमध्ये कायम ठेवावी, गुरुच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची मार्गक्रमणा करावी, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक रघुनाथ शेवडे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते व्यास मुनींच्या प्रतिमेचे व ग्रंथपूजन करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षिका सौ. तांबे यांनी गुरुस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक रघुनाथ शेवडे यांचे स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी प्रास्ताविक करून आपले अंतर्बाह्य जीवन गुरुमुळे घडत असते, त्यामुळे आपण गुरूंचा सन्मान केला पाहिजे, असे सांगितले. यावेळी विद्यार्थी रोशन साळुंके याने गुरुजनांचे महत्व आपल्या विचारातून व्यक्त केले. तर मराठी व संस्कृत विषयांचे शिक्षक महेश धामापूरकर यांनी विचार व्यक्त करत विविध कथांचे दाखले देत गुरुचे महत्व स्पष्ट केले.

पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. मयुरी भिसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू, शिक्षक श्री. सामंत, श्री. धामापूरकर, सौ. अरदकर, सौ. भिसे, सौ. बांदेकर, सौ. तांबे यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page