सटमटवाडी येथे मंजूर असलेला बोगदा व सेवा रस्त्याचे काम न बदलता मुळ आराखड्याप्रमाणेच करावे…

सटमटवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंतांकडे निवेदनद्वारे केली मागणी..

⚡बांदा ता.२१-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर मंजूर असलेला बोगदा व सेवा रस्त्याचे काम हे आराखड्यात बदल न करता मुळ आराखड्याप्रमाणेच करावे अशा मागणीचे निवेदन सटमटवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिकांना अंधारात ठेवत मुळ आराखड्यात बदल करण्यासाठी महामार्ग विभागाला पत्र दिल्याने सटमटवाडी ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात वाद रंगला होता.
निवेदनात म्हटले आहे कि, सटमटवाडी महिला संघर्ष समिती व ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नातून व नियमित पाठपुराव्यातून याठिकाणी बोगदा व सेवा रस्ता मंजूर करण्यात आला. गोवा राज्याच्या दिशेने बोगद्यासह सेवा रस्त्याचे काम हे अर्धवट स्थितीत झाल्याने या मार्गावरून ग्रामस्थांना ये जा करणे हे अवघड झाले आहे. तसेच एका बाजूकडील सेवा रस्त्याचा उतार हा प्रचंड तीव्रतेने करण्यात आल्याने याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून मोठ्या वाहनांना देखील वळविणे अवघड जाणार आहे. बोगद्यातून महामार्गावर जाणार सेवा रस्ता हा ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता बदलण्यात आला आहे. हा रस्ता लगतच्या स्मशानभूमीतून वाळविण्यात आला आहे. या रस्त्यावर स्थानिकांची हरकत असून मुळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आतापर्यंत याठिकाणी झालेल्या अपघातात ९ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी नियोजित आराखड्यात कोणताही बदल न करता मुळ आराखड्यानुसारच काम करण्यात यावे.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री साळुंखे व श्री कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सटमटवाडीतील ग्रामस्थ आनंद वसकर, अक्षय परब, प्रदीप कळंगुटकर, दिगंबर वीर, जीवबा वीर, दत्तानंद चौकुळकर, विशाल कळंगुटकर, सचिन वीर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page