देवगड(प्रतिनिधी)
देवगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीने ठीकठिकाणी पडझड होऊन सुमारे 60 हजाराचे नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संंतप्तधार ही सुरूच आहे.
सलग दोन-तीन दिवस कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
देवगड तालुक्यात १७१ मीमी इतक्या पावसाची नोंद असून दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे हिंदळे येथील दीपक तुकाराम राणे यांच्या गोठ्यावर रात्री माडाचे झाड मुळासहित उन्मळून पडल्याने कोठ्याचे पत्रे व कौलांचे नुकसान झाले आहे. तर पोयरे येथील सुनंदा आत्माराम घाडी यांच्या घराची कौले फुटून ८०००/- तेथीलच सुनंदा शंकर घाडी यांच्या घराच्या पडवीची भिंत कोसळून ९०००/- ,तिर्लोट येथील अमित अंकुश घाडी यांच्या राहत्या घराचे पाच सिमेंट पत्रे फुटून ५०००/-, तेथीलच हरिहर जयराम घाडी यांच्या राहत्या घराच्या पडवीचे चार सिमेंट पत्रे फुटून ४००० /- , वाघोटन येथील पद्माकर बापू खरात निरंकारी यांच्या जनावरांच्या गोठ्यावर आंब्याचे कलम मोडून पडल्याने दहा फुटी सिमेंट पत्रे व लोखंडी अँगल वाकल्याने सुमारे ३४०००/-असे एकूण ६० हजार रुपयांचे नुकसान पडझडीमुळे झाली आहे.
सोमवारी दुपारनंतर पावसाचा वेग ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत होते
