भटवाडी शाळेने राबविला “बळीराजासाठी एक दिवस” उपक्रम…

सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांनी बांधावरची शाळा भरवत शेती कामाचा लुटला आनंद..

⚡सावंतवाडी ता.१३-: शाळेतील अभ्यास खेळ व आजच्या डिजिटल युगात मोबाईल व कम्प्युटरवर रमणाऱ्या चिमुकल्या हातांमध्ये भाताची रोपं आल्यावर शेतीतील तो मुलांचा आनंद अवर्णनीय दिसत होता. ऐरवी मैदानात खेळणारी ही मुलं चिखल माती तुडवीत प्रत्यक्ष चिखलात उतरून शेतीचा आनंद घेताना चिखलातून उगवलेल्या कमळांप्रमाणेच भासत होती. निमित्त होते ते “बळीराजासाठी एक दिवस ” उपक्रमाचे ..
“बळीराजासाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत भटवाडी येथील कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी शाळा नं. 6 प्राथमिक शाळेच्या शिक्षक व मुलांनी बांधावरची शाळा उपक्रमांतर्गत भटवाडी येथीलच शेतकरी परशुराम गावडे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष तरवा काढणी व भात लावणी आदी शेतीच्या विविध कामांचा आनंद लुटला.

विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शेतकरी म्हणजेच बळीराजाबद्दल यांच्या मनात आदर व प्रेम निर्माण व्हावे, आपला देश शेतीप्रधान असल्याने शेती विषयी माहिती मिळावी, मुलांना शेतीचे महत्व पटावे, शेतीसाठी लागणाऱ्या बी-बियाणांची ओळख व्हावी, शेतीची अवजारे, खते, कीटकनाशके ह्या गोष्टींचा परिचय व्हावा या हेतूने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने “बळीराजासाठी एक दिवस” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय भटवाडी सावंतवाडी शाळा नं. 6 या शाळेतील, शिक्षकांनी मुलांसोबत शेतीत जाऊन एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष बांधावरच शाळा भरविली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पुनम तूयेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, शिक्षिका सायली लांबर,बालवाडी शिक्षिका गावडे बाई, देऊ गावडे, दीपा गावडे, श्री तेजम व इत्यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी परशुराम गावडे व त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page