वाहतूक विस्कळित जनजीवन ठप्प..
⚡दोडामार्ग ता.०७-: मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे व जनजीवन ठप्प झाले आहे.दोडामार्ग – तिलारी – वीजघर मार्गावर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर रस्त्यात पाणी साचल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते अनेकांच्या घरात रस्त्यावरील पाणी पोचले होते.
याच मार्गावरील साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील श्री गणपती व दामोदर मंदिरासमोर नवीन पुलाच्या जोड रस्त्यावर पाणी साचल्याने पुलावरुन जाण्याचा मार्ग बंद झाला होता.या मार्गाने तिलारी घाटातून कोल्हापूर ,बेळगावला जाता येते मात्र पाटणे फाटा व मोटणवाडी येथील पुलावर पाणी असल्याने तो मार्ग बंद झाला होता. मणेरी येथील जठार देवस्थानातही मंदिर परिसरात पाणी घुसले होते.तालुक्यातील अंतर्गत भागातील रस्त्यावर असलेले कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग बंद झाले होते.त्याचा फटका वर्षा पर्यटनासाठी मांगेली येथे जाणाऱ्या अनेक पर्यटकांनाही बसला.
