वेंगुर्ले :वेंगुर्ले – सावंतवाडी मार्गावरील होडावडा येथील फुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच नदीचे पाणी भात शेतीमध्ये घुसल्याने शेतीही पाण्याखाली गेली आहे.
होडावडा येथील हे नदीवरील पूल रस्त्याच्या बरोबर सखल भागात असल्याने दरवर्षी मोठा पाऊस झाला की या पुलावर पाणी येते. आणि वाहतूक ठप्प होते. आज रविवारी सकाळपासूनच वेंगुर्ले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. होडावडा येथून वाहणाऱ्या या नदीला पूर आल्याने पाणी होडावडा पुलावरून वाहत आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेले काही दिवस संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच भात शेती लावणी केली होती. मात्र हे नदीचे पाणी आता शेतात घुसल्याने सर्व आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान पुलावर पाणी असताना कुणीही पाण्यातून गाड्यांची वाहतूक करू नये असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.
