विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे ८ रोजी धरणे आंदोलन…

ओरोस ता ३
प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणेसाठी ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून २१ जून २०२३ च्या शासन आदेशाने खुली जिल्हांतर्गत बदलीची संधी दिलेली होती . वेळी वेळी मागणी करून याबाबत सुमारे ८ महिने कालावधि नंतर दिनांक ११ मार्च २०२४ रोजी कार्यवाहीसाठी धरणे आंदोलन छेडावे लागले .तरीही प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी दिलेली नसून ही शासन आदेशाची अधिकाऱ्यांकडून होणारी पायमल्ली आहे अशी आमची धारणा आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारून पूर्ततेसाठी आश्वासित केले होते. मात्र अद्याप काही समस्यांची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
जिल्हाअंतर्गत बदली धोरण आदेश २१ जून २०२३ ची संपूर्ण कार्यवाही करणे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे. विस्तार अधिकारी- केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करणे. प्रलंबित गणित – विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना तात्काळ नियुक्त्या देणे व प्रलंबित पदवीधर वेतनश्रेणी तातडीने लागू करणे. वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताब मंजुरी करून शिक्षकांना वेळीच लाभ देणे. नवनियुक्त शिक्षकांचे सेवापट, सेवा पुस्तिका भरणेसाठी तालुका वार कॅम्पचे आयोजन करणे. या मागण्यांची कार्यवाही व्हावी, यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष राजा कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

You cannot copy content of this page