वर्धापनदिन कार्यक्रमात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे सूतोवाच..
ओरोस ता.०१-: आम्ही महिलांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी बँक सखी म्हणून नियुक्त करणार आहोत. तसेच पिग्मी एजंट आणि मायक्रो एटीएम सेवा यामुळे जिल्हा बँकेच्या वृध्दीत वेगाने वाढ होत आहे. ग्राहकांना अधिकाधिक वेगाने सेवा देण्यासाठी कृती कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यात विकास संस्थांमध्ये बँकेच्या सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना बँक शाखेत जाण्याची गरज पडणार नाही. बँकेची सेवा विकास संस्थेत मिळेल. २५० कोटी रुपये शेती कर्ज वितरित करीत आहोत. ते आम्हाला ३५० कोटी करायचे आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात बँकेचा ४१ वा वर्धापनदिन आणि कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, व्हिक्टर डांटस, बाबा परब यांच्यासह अधिकारी, पिग्मी एजंट, दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी, संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष दळवी यांनी, आपली जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे. तिची घौडदौड कायम ठेवण्यासाठी. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न चालला आहे. या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्यांनी, जिल्हा वासीयांनी साथ द्यावी, अशा प्रकारचे एक आव्हान आपण या निमित्ताने करतो. तसेच आपण आतापर्यंत टाकलेल्या विश्वास निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सार्थकी लावू अशा प्रकारचे ग्वाही आपण या निमित्ताने देतो. याच प्रमाणे वंचित आणि खावटी कर्ज माफी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही आश्र्वासित केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ संचालक व्हिक्टर डांटस यांनी, जिल्हा बँकेच्या यशस्वीतेचे सिंधुदुर्ग वासियांना श्रेय जाते. मनीष दळवी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर खूप नवीन योजना आणल्या आहेत. सुविधा निर्माण केल्या आहेत. संचालक मंडळाच्या सहकार्याने ही बँक पुढे जात आहे, असे सांगत असेच सहकार्य यापुढे बँकेच्या सर्व घटकांनी करावे, असे आवाहन केले.
चौकट
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी, बँकेचा आज ४१ वा वर्धापनदिन आहे. बँकेच्या विकासात सर्वांचाच मोठा सहभाग आहे. जिल्हा बँकेने यावर्षी ३५०० कोटी रुपये निधी ठेविचा निर्धार केला आहे. आतापर्यंत २१०० कोटी ठेवी पूर्ण झाल्या आहेत. तसेच ३० जून शेतिकर्ज वसुलीचे वर्ष म्हटले जाते. गतवर्षी ८० टक्के वसुली झाली होती. यावर्षी ८२.५० टक्के वसुली झाली आहे. म्हणजेच यातही वाढ केली आहे, असे सांगितले.
