जिल्हा बँकेचा ४१ वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा…

ओरोस ता.०१-:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आज ४२ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त मायक्रो एटीएममध्ये सर्व बँकांचे फीचर्सचा समावेश करण्यात आला. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, जिल्ह्यातील दहावी, बारावीतील प्रथम तीन विजेते विद्यार्थी, कर्मचारी गुणवंत पाल्य, तसेच पिग्मी एजंट यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी बँकेचा ४१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.


सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात बँकेचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, व्हिक्टर डांटस, बाबा परब यांच्यासह अधिकारी, पिग्मी एजंट, दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी, संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४१ जणांनी रक्तदान केले. त्यानंतर बँकेच्या प्रधान कार्यालय परिसरात जांभूळ झाडांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. तसेच बँकेने सुरू केलेल्या घरपोच सेवा मधील मायक्रो एटीएममध्ये केवळ जिल्हा बँकेचे कार्ड चालत होते. मात्र, आजपासून निविन फीचर्सचा समावेश करण्यात आला. मायक्रो एटीएम डिव्हाईसमध्ये सर्व बँकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ जिल्हा बँकेचेच नाही तर सर्व बँकांचे एटीएम चालणार आहे. त्याचाही शुभारंभ आज करण्यात आला.
याशिवाय जिल्ह्यात दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. अल्पबचत सुविधा अंतर्गत चांगले काम केलेल्याअभिजित वंजारे-घोटगे, विष्णू जोशी-आरोंदा, रवींद्र आदम-पडेल यांचा सत्कार करण्यात आला. पिग्मी एजंट मधून सर्वोत्कृष्ट काम केलेल्या सुनील सांबारी, कमल तिरवडेकर कुडाळ आणि श्री घुबडे दोडामार्ग यांचाही भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. याच बरोबर चांगले काम केलेल्या पाच विकास संस्थांच्या सचिवांचाही सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page