ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी:लोखंडी एलईडीवर भाजप अंकुश ठेवणार का, असाही केला प्रश्न..
मालवण (प्रतिनिधी)
राज्यातील भाजप सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकणातील मच्छिमारांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. भाजप सरकारने मच्छिमारांना वाऱ्यावर सोडले आहे. अशातच मालवण मधील भाजपच्या एका माजी नगरसेवकाने लोखंडी एलइडी पर्ससीन बोट आणल्याची चर्चा असून त्यावर भाजप अंकुश ठेवणार का ? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख आणि मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला.
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बाबी जोगी हे बोलत होते. श्री. जोगी म्हणाले, आज मत्स्य व्यवसाय विभागात पदे भरलेली नाहीत. अनेक पदे रिक्त आहेत. अनधिकृत मासेमारीवर कारवाईसाठी गस्तीनौका नाही. रत्नागिरीत गस्तीनौका दिली गेली, मात्र, सिंधुदुर्गात गेले दोन वर्षे गस्ती नौका नाही. यामुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका पकडल्या जात नाहीत. समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन, एलइडी नौका मत्स्य आयुक्ताना दाखवूनही कारवाई होत नाही. मासेमारी अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक अंमलबजावणी कक्षाच्या उभारणीसाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. यामुळे भाजप सरकारने मच्छिमारांना वाऱ्यावर सोडले असून येणाऱ्या काळात मच्छिमार याचे उत्तर भाजपला देतील, असा इशाराही बाबी जोगी यांनी दिला आहे.
